आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीचे श्रेय घ्यायचे की शेतकऱ्यांचे सांत्वन करायचे? शिवसेना द्विधा मन:स्थितीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली. - Divya Marathi
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली.
नाशिक- दीड लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफीच्या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नाशिक ते पुणतांबा दाैऱ्यात शिवसेना द्विधा मन:स्थितीत दिसून अाली. कर्जमाफीच्या निर्णयाचे श्रेय घ्यायचे की या अर्धवट निर्णयामुळे नाराज शेतकऱ्यांचे सांत्वन करायचे असा पेच खुद्द उद्धव ठाकरेंसमाेरही हाेता. ‘या निर्णयाचे श्रेयच घ्यायचे असते तर या निर्णयाचा सर्वाधिक फायदा हाेणाऱ्या  विदर्भ- मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या भेटीला मी गेलाे असताे. पण मी तसे केले नाही. ज्यांच्या हिमतीमुळे या आंदोलनाची ठिणगी पेटली, परंतु त्यांना कर्जमाफीच्या निर्णयाचा फारसा लाभ मिळणार नाही, त्या नाशिक आणि नगरच्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मी प्रथम आलो अाहे,’ असे ठाकरेंनी अापल्या भाषणात सांगितले.  

३० जून २०१६ पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचेच कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परंतु गेल्या वर्षीच्या पुनर्गठनामुळे नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी २०१६ ची थकबाकी भरली आहे. त्यामुळे कर्जमाफीचा फायदा त्यांना हाेणार नाही. परिणामी नाशिक दाैऱ्यावर अालेल्या उद्धव ठाकरेंना या शेतकऱ्यांसमाेर श्रेय घेता येणार नाही याची जाणीव हाेती. मात्र अापल्यामुळेच कर्जमाफी झाली हे सांगण्याचाही शिवसेनेचा प्रयत्न लपून राहिलेला नाही.   

नाशिकमध्ये महिनाभरापूर्वी झालेल्या ‘मी कर्जमुक्त होणारच’ या शिवसेनेच्या कृषी अधिवेधनास मोठा प्रतिसाद देणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना अाता मात्र कर्जमाफीच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांच्या नाराजीस सामोरे जावे लागत आहे. पण त्याचवेळी  पक्षप्रमुखांचे होर्डिंग्ज लावून आणि फटाके वाजवून या निर्णयाचं श्रेयही द्यावे लागतं आहे. परिणामी, गावागावातील चौकात कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानणारे भाजपचे होर्डिंग्ज आणि त्या शेजारीच उद्धव ठाकरे यांचे आभार मानणारे शिवसेनेचे होर्डिंग्ज एकमेकांशेजारी झळकत आहेत.  

शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांना शेतकऱ्यांची नाराजी आणि त्यांची कोंडी अाधीच कळवल्याने केवळ महामार्ग दौरा न करता, उद्धव यांना चौकाचौकात थांबून शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकावे लागले. नियोजित वेळेपेक्षा विलंब झाल्यावरही ते हा दौरा उरकू शकले नाहीत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांना मेळाव्यास्थळी येऊन बोलण्यासही भाग पाडले.  
 
हेही वाचा..
 
 
बातम्या आणखी आहेत...