आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Alliance News In Marathi, Nationalist Congress, Narendra Modi

कॉँग्रेस राष्‍ट्रवादी आघाडीच्या नेत्यांनी घेतली नरेंद्र मोदींची धास्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - देशात नरेंद्र मोदींची लाट असल्याचे चित्र केवळ माध्यमांनी उभे केले आहे, असे ज्या व्यासपीठावरून ऊर बडवून सांगण्यात आले; त्याच व्यासपीठावरून राष्‍ट्रवादीचे राष्‍ट्रीय अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. छगन भुजबळ यांच्यासह बहुसंख्य नेत्यांनी पूर्णवेळ मोदींवरच तोफ डागून मोदींची या नेत्यांनी किती धास्ती घेतली आहे हेच जणू अधोरेखित केले. दादासाहेब गायकवाड सभागृहात झालेल्या झालेल्या कॉँग्रेस- राष्‍ट्रवादी आघाडीच्या संयुक्त मेळाव्यात केवळ ‘मोदी एके मोदी’चीच अनुभूती सर्वांना आली.


मोदींची लाट ही माध्यमांनी तयार केलेली आहे, असे सांगत शरद पवारांसह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॉँग्रेस-राष्‍ट्रवादीच्या कामकाजाची भलामण केली. मात्र, हे सांगताना सर्वच मंत्रीगणांपासून स्थानिक नेत्यांपर्यंत सर्वांनीच मोदींच्या कामकाजावर व गुजरात मॉडेलवर तिखट टीका केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, 2014 ची ही निवडणूक पुढील दिशा ठरविणारी आहे. यावेळेला जातीयवादी शक्तीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. संसदीय लोकशाही प्रणालीला छेद देत निवडणुकीपूर्वीच पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. विशेष म्हणजे मोदीही कुठल्याही गोष्टीचा ठावठिकाणा नसताना पुढील धोरणे जाहीर करीत आहेत. वास्तविक, देशातील नवीन धोरणांची वाच्यताच केली जात नाही. विकासाच्या बाबतीत गुजरातच्या तुलनेत महाराष्‍ट्र अव्वलच आहे. आम्ही कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी केले. केंद्रातील सरकारनेही दहा वर्षात रस्ते, विमानतळ, इंडस्ट्रियल कॉरिडॉर या सारखी कामे करुन विकासाला गती दिली. यापुढे सत्ता मिळाल्यास दारिद्र्यरेषेखाली कोणीही राहणार नाही. कुटुंंबातील कोणी दगावल्यास संबंधितांना आरोग्य विमासारख्या योजनांनी आधार देता येईल अशा योजना आम्ही राबविणार आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, देशाकरिता ही निवडणूक महत्त्वाची आहे. जातीयवादी शक्तींना रोखायचे असेल आणि देशाचे पुरोगामित्व टिकवून ठेवायचे असेल तर आघाडीला बळकटी देणे गरजेचे आहे. राज्यातील सरकारने शेततळ्यांचे नेटवर्क उभे केले. वेळोवेळी अडचणीतील शेतकºयांच्या पाठीशी उभे राहिले. दुष्काळात शेतकºयांना एकरी मदत केली. त्यामुळे हे सरकार पुन्हा आणण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे, असेही थोरात म्हणाले. या वेळी वनाधिपती विनायकदादा पाटील, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे, रिपब्लिकन पार्टीचे गणेश उन्हवणे यांनीही मनोगत व्यक्त केले. आ. माणिकराव कोकाटे, आ. निर्मला गावित, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजराम पानगव्हाणे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सरकटे बंधुंनी देशभक्तीपर व महाराष्‍ट्र गिते सादर केलीत.


मुख्यमंत्री म्हणाले
०कुठल्याही व्यासपीठावर बोलवा; महाराष्‍ट्र आणि गुजरातची वास्तव तुलना करेल
०मोदींचे व्यक्तिमत्वच हुकूमशाही पध्दतीचे
०मोदींनी ज्येष्ठांचा अपमान करून स्वत:कडे नेतृत्व घेतले
०देशाची लोकशाही परंपरा नष्ट करणारा नेता
०सर्वप्रथम कलम 370, अयोध्येतील राम मंदिर आणि समान नागरी कायदा याबाबतची भूमिका स्पष्ट करा
०भूमिकांचे गुंडाळे ठेवून काहीच स्पष्ट न करण्याचे भाजपचे धोरण


अन्य पक्षांचा अनुल्लेख
एकीकडे मोदींच्या कामकाजावर टीकास्त्र सोडले जात असताना दुसरीकडे शिवसेना, मनसे आणि आम आदमी या विरोधकांवर भाष्य करण्यास सर्वच नेत्यांकडून टाळण्यात आले. त्यामुळे या सर्वच नेत्यांनी मोदींचाच किती धसका घेतला आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.