आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress And Nationalist Congress News In Marathi, Sharad Pawar, Divya Marathi

गटबाजीला उधाण त्यावर कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीत मानापानाचे नाट्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व पृथ्वीराज चव्हाण या दोघांच्या मध्यस्थीनंतरही आघाडीतील शीतयुद्ध सुरूच असल्याचे चित्र असून, त्याचा परिणाम म्हणून आघाडीकडून छगन भुजबळ यांच्यासारखा हेविवेट नेता रिंगणात असतानाही कॉँग्रेसचे पदाधिकारी, माजीमंत्री तसेच नगरसेवक प्रचारापासून दूर असल्याचे चित्र आहे. किंबहुना प्रचारात सहभागी होण्यावरून कॉँग्रेसमध्ये मानापानाचे राजकारण रंगले असून, प्रतिस्पर्धी गटाला राष्ट्रवादीकडून झुकते माप दिले जात असल्याचा आक्षेप घेत अनेक ज्येष्ठ पदाधिकारी रुसून बसले आहेत.


लोकसभा निवडणूक राहुल गांधी यांच्यासाठी महत्त्वाची असल्याचे कारण व्यासपीठावरून देणारे पदाधिकारी प्रत्यक्षात प्रचारात मात्र उतरलेले नाही. मुळात कॉँग्रेसचा विचार केला तर येथेच एकोप्याचे वातावरण नाही. शहराध्यक्षपदावरून आकाश छाजेड यांना हटवल्यानंतर नूतन शहराध्यक्ष झालेल्या अश्विनी बोरस्ते यांच्यासमोरील अडचणी संपता संपलेल्या नाही. किंबहुना बोरस्ते यादेखील एका विशिष्ट गटाच्या प्रतिनिधी असल्याचा प्रचार चालवला जात आहे. त्यामुळे बोरस्ते या भुजबळ यांच्या प्रचारात उतरल्यानंतर मानापानाचा मुद्दा करून काही पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादीकडे पाठ फिरवली. बोरस्ते आणि जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शैलेश कुटे यांच्यासह महापालिकेतील 14 नगरसेवकांपैकी केवळ दोन-चारच नगरसेवक प्रचारात दिसतात. उर्वरित नगरसेवक, पक्षाचे प्रदेश पातळीवरील पदाधिकारी, विविध आघाड्या, युवक कॉँग्रेस, मंडलाचे प्रमुखदेखील फारसे नजरेस पडत नाहीत. तसेच, छाजेड पिता-पुत्र, माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्यासह इतर आजी-माजी नेतेमंडळीची अनुपस्थितीही प्रकर्षाने जाणवते. बहुतांशी मंडळी उघडपणे नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. उमेदवार आघाडीचा असा प्रचार होतो; मात्र जबाबदारी फक्त राष्ट्रवादीच्याच पदाधिकार्‍यांना दिली जात असल्यामुळे निव्वळ उपस्थितीसाठी तरी कशाला हजर राहायचे असा सूर कॉँग्रेसजनांकडून व्यक्त होत आहे. प्रचार यंत्रणेत कॉँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना कुठलेही ‘महत्त्व’ दिले जात नसताना सर्वच ‘नियोजन’ राष्ट्रवादीतील नवख्यांकडे असल्याचीही सल व्यक्त केली जात आहे. निवडणुकीनंतर विविध शासकीय, अशासकीय समिती सदस्य निवडीत कॉँग्रेस कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा मुद्दाही नाराजीच्या केंद्रस्थानी आहे. इतकेच नव्हे, तर मनपा निवडणुका असो की, विधानसभेच्या राष्ट्रवादीकडून मित्रपक्षाऐवजी विरोधी पक्षालाच जवळ करीत बेरजेचे राजकारण केले जाते, त्यामुळे आपल्याला किंमतच दिली जात नसल्यामुळे घरी राहणेच बरे असे नेते बोलत आहेत.


जि.प. सदस्यांचे ‘एकला चलो..’
नाशिक मतदारसंघात कॉँग्रेसचे आठ जिल्हा परिषद आणि पंधराहून अधिक पंचायत समिती सदस्य असून, त्यांच्याकडून उघडपणे विरोधात भूमिका घेतल्याचे दिसून येते. जिल्हा परिषद सदस्यांना निधी वाटपात राष्ट्रवादीकडून दुजाभावाची वागणूक दिल्याचा आरोप केला जात आहे. तसेच महत्त्वाच्या विकासकामांचे श्रेय लाटणे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रतिस्पध्र्याला बळ पुरवण्यासारखे मुद्दे प्रतिष्ठेचे केले जात आहेत.


ग्रामीण भागातही आघाडीची बिघाडी
शहरातील तीनही मतदारसंघात ज्या पद्धतीने कॉँग्रेसकडून प्रचारफेर्‍या, सभांपासून दूर राहून ‘काम’ केले जात आहे, तशीच परिस्थिती ग्रामीण भागात दिसून येते. सिन्नर तालुक्यात आमदार माणिकराव कोकाटे यांचे सर्मथक तथा पंचायत समिती सभापती बाळासाहेब वाघ यांनी उघडपणे भुजबळांविरोधी भूमिका घेतली. त्यापाठोपाठ सिन्नर नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यदेखील अद्यापपर्यंत राष्ट्रवादीच्या प्रचार यंत्रणेपासून लांबच राहिले. त्र्यंबक, इगतपुरी तालुक्यातदेखील आमदार निर्मला गावित वगळता इतर पदाधिकारीही राष्ट्रवादीपासून अंतर राखून आहेत. उर्वरित पदाधिकारी नजीकच्या धुळे मतदारसंघात बागलाण व मालेगाव येथे दौर्‍याच्या निमित्ताने तिकडेच राहतात.