आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिढा सुटूनही काँग्रेसचे नवे शहराध्यक्ष पदापासून दूरच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- काँग्रेसचे तत्कालीन शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्याविरोधात मोर्चा उघडून प्रतिकाँग्रेस चालविणार्‍या नेतेमंडळींना दोन वर्षांनंतर का होईना यश आले असले तरी नूतन शहराध्यक्ष तथा नगरसेविका अश्विनी बोरस्ते यांनी नियुक्तीला आठवडा उलटूनही पदभार स्वीकारला नसल्याने पदाधिकार्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सोमवारी होणारा नियोजित समारंभही ऐनवेळी रद्द झाल्याने त्यात आणखीच भर पडली आहे.

माजी शहराध्यक्ष अँड. छाजेड यांच्याविरोधात प्रदेश पदाधिकार्‍यांसह दोघा आमदार व स्थानिक पदाधिकार्‍यांनी दोन वर्षांपासून बहिष्काराचे अस्त्र उगारत स्वतंत्र गट स्थापला होता. छाजेड यांना हटविण्यासाठी जाहीर कार्यक्रमात त्यांच्यावर टीका करीत पक्षनेतृत्वावर तोफ डागली होती. टिळक भवनासमोर उपोषणाचा इशारा महिला पदाधिकार्‍यांनी दिला होता. अखेर पक्षनेतृत्वाने आगामी निवडणुका लक्षात घेत छाजेडांची उचलबांगडी करीत अश्विनी बोरस्ते यांची नियुक्ती केली.

या निर्णयाचे जाहीर स्वागत करणार्‍या प्रतिकाँग्रेसची मोट बांधणार्‍यांनी दोन दिवसांनंतर नाराजीचा सूर आळवला. छाजेड पिता-पुत्रांना हटविण्यासाठी स्थानिक तसेच प्रदेश नेत्यांशी वैर घेत गट-तट विसरून ज्यांनी एकत्रित आणले, त्याच मंडळींना या पदापासून बाजूला ठेवण्यात आल्याची सल या गटाचे नेतृत्व करणार्‍यांच्या मनात बोचत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रतिकाँग्रेसच्या मंडळींकडून पुन्हा तोच कित्ता गिरविला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचीच भिती बाळगून नूतन शहराध्यक्षांनी तूर्त पदभार घेणे टाळल्याचे दिसून येत आहे.

नेत्यांच्या भेटीगाठींना प्राधान्य
पक्षाने शहराध्यक्षपदाची मोठी जबाबदारी दिली असून, ती सर्मथपणे पार पाडण्यासाठी नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहे. पदभार स्वीकारण्यापूर्वी आजी-माजी पदाधिकार्‍यांना, नगरसेवकांना भेटून सर्वसंमतीने दिवस निश्चित केला जाईल. जेणेकरून सर्वांना सोबत घेऊन पक्षवाढीसाठी काम करता येईल. - अश्विनी बोरस्ते, शहराध्यक्षा

गटबाजी दूर करण्याचा प्रयत्न
सोमवारी मंत्र्यांच्या उपस्थितीत बोरस्ते पदभार स्वीकारणार होत्या; मात्र काही कारणास्तव हा कार्यक्रम रद्द झाला. पक्षनेत्यांची लवकरच तारीख मिळवून मोठा समारंभ घेण्यात येईल. माझ्या कार्यकाळात विरोध करणार्‍यांनी बोरस्ते यांना पक्षवाढीसाठी साथ देण्यासाठी एकत्रित आले पाहिजे. -आकाश छाजेड, माजी शहराध्यक्ष