आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस शहराध्यक्षांच्या विराेधात निष्ठावंत जाणार प्रदेश दरबारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नाशिक : महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांच्या मुलाखती, मेळावे, युती-अाघाडीची चर्चा झडत असून, पक्षातील विद्यमान नगरसेवकांना पक्षांतर करण्यापासून त्यांच्या पक्षश्रेष्ठींचे प्रयत्न सुरू अाहेत. मात्र, या प्रक्रियेला काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अाहेर हे अपवाद ठरत असल्याचा सूर त्यांच्याच पदाधिकाऱ्यांकडून जाहीरपणे व्यक्त हाेत अाहे. 
 
राष्ट्रवादी मनसेशी काही प्रभागांत छुपी अाघाडीचा प्रयत्न हाेत असताना ते निमूट बघत असल्याने त्यांच्याविराेधात थेट प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण प्रभारी भाई जगताप यांच्याकडे जाण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा अाहे. 
 
मनपा-जिल्हा परिषद निवडणुकांची घाेषणा हाेण्यापूर्वीच प्रभारी भाई जगताप यांनी काँग्रेस कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांसह पक्षाच्या इच्छुकांची बैठक घेतली हाेती. या बैठकीतही बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीशी अाघाडी करण्यास विराेध दर्शविला हाेता.
 
 त्यातच राष्ट्रवादीचे स्थानिक प्रमुख नेत्यांमध्ये माजी मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ हे वर्षभरापासून भ्रष्टाचाराच्या अाराेपात कारागृहात असून, त्यापाठाेपाठ माजी खासदार देवीदास पिंगळे हे बाजार समिती भ्रष्टाचार प्रकरणी कारागृहात अाहेत. यापेक्षाही गंभीर असे बनावट नाेटा छपाई प्रकरणात पक्षाचा कार्याध्यक्ष छबू नागरे त्याची टाेळी पाेलिसांनी जेरबंद केली अाहे. 
 
या घटना काँग्रेसच्या इच्छुकांनी प्रभारींसह प्रदेशाध्यक्षांच्या लक्षात अाणून देत मतदारांपुढे काेणत्या ताेंडाने मते मागणार, असा सवाल केला. त्याचीच री प्रभारींनी अाेढून नाशिकचा ‘तेलगी’ म्हणून उल्लेख करीत राष्ट्रवादीशी अाघाडी हाेणार नसल्याचे संकेत दिले.
 
या पार्श्वभूमीवर पक्षाच्या निष्ठावंतांनी उमेदवारीसाठी तयारी केली असतानाच, दुसरीकडे मात्र शहराध्यक्षांकडून त्यांच्या साेयीच्या उमेदवारांना प्राधान्य दिले जात असून, काही विद्यमान नगरसेवक परस्परच मनसे-राष्ट्रवादीशी अाघाडी करण्याच्या तयारीत अाहेत.
 
 या मंडळींनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसह इतरांना विश्वासात घेता पॅनलचे पत्रक छापून माेकळे झाले अाहे. यांसह वर्षभरात पक्षाच्या सात नगरसेवकांनी पक्षांतर करीत सेना-भाजपची वाट धरली. त्यापाठाेपाठ अाणखी तीन पक्षांतराच्या तयारीत असतानाही शहराध्यक्षांकडून त्यांना थांबविण्याचे प्रयत्न हाेत नसल्याचा अाराेप माजी अध्यक्षांसह इच्छुक उमेदवारांकडून केला जात अाहे. 
 
यासंदर्भात नुकतीच पक्षातील ज्येष्ठ मंडळी अाणि एनएसयूअाय (सेवा दलाच्या) पदाधिकाऱ्यांनी मराठा मंगल कार्यालयातील बैठकीतही शहराध्यक्षांच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 
 
हकालपट्टीच्या कारवाईचा विसर 
दरम्यान,निवडणुका जाहीर हाेण्यापूर्वीच काँग्रेसच्या नगरसेवकांनी शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी जवळीक साधल्याने ते पक्षांतर करणार असल्याचे लक्षात येऊनही त्यांची वेळीच हकालपट्टी अथवा त्यांना पक्षशिस्तीच्या मुद्यावरून निलंबनाची कारवाई करता येणे शक्य हाेते. 
मात्र, त्याचाही विचार त्यांनी केला नसल्यानेही पदाधिकाऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.
 
यामध्ये नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, उद्धव निमसे यांच्या पक्षप्रवेशानंतरही त्यांनी उघडपणे भूमिका घेतल्यानेही आश्चर्य व्यक्त हाेत अाहे. या सर्वच पार्श्वभूमीवर शहराध्यक्षांविराेधात निष्ठावंतांकडून प्रदेशाध्यक्ष, प्रभारींकडे माेर्चा उघडला जाणार असल्याचे वृत्त अाहे.