आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..तर राष्ट्रवादीच्या फलकांना काँग्रेस फासणार काळे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - सार्वजनिक बांधकाम खात्याने सिन्नर व इगतपुरी तालुक्यांमध्ये केलेल्या विकासकामांच्या डिजिटल फलकांवर आमदार माणिकराव कोकाटे व काँग्रेसचा नामोल्लेखही नसल्याने कॉँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. कोकाटे व कॉँग्रेस नेत्यांचा सन्मान न ठेवल्यास या फलकांना काळे फासण्यात येईल व आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारास मदत केली जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेचे माजी सभापती व जिल्हा कॉँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अँड. राजेंद्र चव्हाणके यांच्या अध्यक्षतेखाली आमदार कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात रविवारी झालेल्या बैठकीत या विषयावर गरमागरम चर्चा झाली. आठवडाभराच्या आत सार्वजनिक बांधकाम विभागाचे विवादित फलक काढून त्या जागेवर काँग्रेसच्या स्थानिक लोकप्रतिनिधींची नावे व छायाचित्रांचा समावेश असलेले सुधारित फलक लावावेत; अन्यथा जुन्या फलकांवर काळे फासण्याचा इशारा देण्यात आला. कॉँग्रेस लोकप्रतिनिधींचा सन्मान राखला न गेल्यास आगामी निवडणुकांत कॉँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारास काहीही मदत करणार नसल्याचा इशाराही या वेळी देण्यात आला. बैठकीत तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष विनायक सांगळे, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समिती सभापती राजेश नवाळे, सदस्य केरूपवार, अँड. इलियास खतीब, उपनगराध्यक्षा लता मुंडे यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रोटोकॉल भंगाची तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे करणार
केंद्र आणि राज्यात आघाडी सरकार असल्याने विकासकामांच्या फलकांवर मंत्री व खासदारांसोबत कॉँग्रेस नेते व स्थानिक लोकप्रतिनिधींची छायाचित्रे व नावे टाकणे बंधनकारक आहे. असे असतानाही त्यावर केवळ सार्वजनिक बांधकाममंत्री व खासदार यांचाच उल्लेख करण्यात आल्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना कोकाटे यांचे छायाचित्र व नाव हेतुपुरस्सर वगळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. हा ‘प्रोटोकॉल’चा भंग असून, या प्रकाराबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करण्याचा ठरावदेखील बैठकीत संमत करण्यात आला.