नाशिक- घाडीसरकारने मुस्लिमांना जाहीर केलेले पाच टक्के आरक्षण नव्या सरकारने रद्द केले. त्यामुळे भाजप सरकार मुस्लिमांवर अन्याय करीत असल्याचा आरोप करून काँग्रेस अल्पसंख्याक सेलतर्फे सोमवारी (दि. ७) शासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. दीड तास चाललेल्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष हनिफ बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखालील या आंदोलनात काँग्रेस शहराध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, नगरसेविका समीना मेमन, महिला आघाडी अध्यक्षा वत्सला खैरे, डॉ. हेमलता पाटील, रईस शेख, जावेद इब्राहिम, रियाज बाबू, अख्तर कोकणी, शेख मो. इब्राहिम, ईसाक कुरेशी, नगरसेविका योगीता आहेर, सय्यद शफीक सहभागी होते.
दरम्यान, सच्चर आयोगाच्या शिफारशींनुसार टक्के आरक्षण जाहीर केले होते. परंतु, नव्या राज्य सरकारने रद्द करून केवळ मराठ्यांच्या आरक्षणाचे विधेयक पारित केले. आरक्षण नसल्यामुळे मुस्लिम तरुणांना इच्छा असूनही संधी मिळत नाही. १९४७ च्या सुमारास ४५ टक्के मुस्लिम नोकरीस होते. आता ते दोन टक्के का झाले, असा सवालही त्यांनी या वेळी केला. या अन्यायाच्या विरोधात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. सरकारने मुस्लिम समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास पुन्हा राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही काँग्रेस अल्पसंख्याक सेलतर्फे देण्यात आला. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीचे निवेदन देण्यात आले.
वाहतूक कोंडीने गैरसोय
अल्पसंख्याककाँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करण्यात आलेल्या धरणे आंदोलनामुळे सीबीएस, मेळा बसस्थानक, त्र्यंबकनाका परिसर, मेहेर सिग्नल, एम. जी.रोड अशोकस्तंभ परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांना गैरसोय सहन करावी लागली.