आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस शहराध्यक्ष बोरस्ते यांचा राजीनामा; शरद आहेर प्रभारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कॉँग्रेस शहराध्यक्ष अश्विनी बोरस्ते यांनी सात महिन्यांतच पदाला रामराम ठोकला आहे. प्रभारी शहराध्यक्ष म्हणून शरद आहेर यांची निवड झाली आहे. बोरस्ते यांनी आजारपणाचे कारण दिले असले तरी लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्टÑवादीशी झालेला बेबनाव, स्वपक्षातील छाजेड व बच्छाव-कुटे समर्थक गटाचे असहकार्य अशी राजकीय कारणेही त्यामागे असल्याची चर्चा आहे.

तत्कालीन शहराध्यक्ष आकाश छाजेड यांना हटवून 27 जानेवारी 2014 रोजी बोरस्ते यांची नियुक्ती झाली होती. त्यावेळी बोरस्ते स्पर्धेतही नव्हत्या. छाजेड यांना हटवण्यासाठी माजीमंत्री शोभा बच्छाव, शैलेश कुटे, हेमलता पाटील, शरद आहेर आदी अनेक नेत्यांनी केलेले प्रयत्न लपून राहिले नव्हते. यातील अनेकांनी शहराध्यक्षपदासाठी लॉबिंगही केले होते. बोरस्ते यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्या कार्यक्रमांवर अघोषित बहिष्कार टाकला जात होता. लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी राष्टÑवादीविरोधात भूमिका घेतली. त्यामुळे बोरस्ते यांना दुहेरी नाराजीला तोंड द्यावे लागले. शहराध्यक्षांमार्फत प्रदेशस्तरीय आदेशाची अंमलबजावणी स्वीकारण्यासाठी नगरसेवकही तयार नव्हते. अधिकार नसल्यामुळे बोरस्ते यांची कोंडी होत असल्याची चर्चा स्वपक्षीयच करीत होते.

बोरस्ते यांनी बुधवारी सायंकाळी राजीनामा दिला. तत्पूर्वी, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आहेर यांच्यावर जबाबदारी सोपवण्याचे निश्चित केले. त्यानंतर गणेश पाटील यांनी हा निर्णय कळवल्याचे आहेर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
आधी गटबाजी संपवा...
विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची चाचपणी करण्यासाठी बुधवारी पक्षनिरीक्षक डॉ. दिनेश परमार यांनी शासकीय विश्रामगृहावर घेतलेल्या बैठकीत युवक काँग्रेसचे तुषार जगताप व अन्य पदाधिकार्‍यांनी प्रथम पक्षातील गटबाजीवर उपाय शोधण्याचा आग्रह धरला. त्यामुळे निरीक्षकांना चाचपणीविनाच परतावे लागले.
शरद आहेर जुने निष्ठावंत
काँग्रेसचे जुने निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे आहेर जिल्हा एन. एस. यू. आय.चे नऊ वर्षे अध्यक्ष होते. पाच वर्षे त्यांच्याकडे युवक काँग्रेसची जबाबदारी होती. दिल्लीत राहुल गांधी यांच्या संकल्पनेतील ‘आम आदमी’चे मुख्य समन्वयक म्हणून त्यांनी तीन वर्षे काम पाहिले. सध्या ते प्रदेश सरचिटणीस आहेत.
कोणाविषयीही नाराजी नाही
प्रकृतीच्या कारणास्तव शहराध्यक्षपदाची जबाबदारी पेलणे अवघड झाले आहे. तसेच, स्वत:च्या प्रभागातील विकासकामे व बचतगटांकडे लक्ष देण्यासाठीही वेळ कमी पडत आहे. माझी कोणाविषयीही नाराजी नाही.
अश्विनी बोरस्ते, नगरसेविका