मालेगाव - महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत कॉँग्रेसचे उमेदवार मोहंमद अस्लम खलील अहमद अन्सारी 12 मते मिळवून विजयी झाले. राष्ट्रावादीचे उमेदवार अजीजुर्ररहेमान यांना अवघी दोन मते मिळाली.
निवडणूक प्रक्रियेवेळी तिस-या आघाडीच्या सदस्या हमीदा मुसा खान या गैरहजर होत्या, तर जनता दलाच्या सदस्या जैबुनिस्सा अब्दुल बाकी यांनी मतदान न करता तटस्थ भूमिका घेतली होती.
स्थायी सभापतिपदासाठी बुधवारी 12 वाजता सभापती दालनात निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर विभागीय महसूल आयुक्त सोनाली पोंक्षे यांच्या अध्यक्षतेखाली प्रक्रिया पार पडली. या वेळी स्थायीचे 15 सदस्य उपस्थित होते.
सभापतिपदासाठी अन्सारी यांचे चार, तर अजीजुर्ररहेमान यांचे तीन असे एकूण सात अर्ज दाखल झाले होते. निर्धारित वेळेत कुणीही माघार न घेतल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले. यात अजीजुर्ररहेमान यांना स्वत:च्या मतासह युनूस ईसा यांचे एक अशी दोन मते मिळाली. तर, कॉँग्रेसचे अस्लम अन्सारी यांना कॉँग्रेस 5, शिवसेना 2, मालेगाव विकास आघाडी 2, जनराज्य आघाडी 1, तिसरा महाज 2 व मित्रपक्ष 1 अशा 12 सदस्यांनी मतदान केले. अन्सारी यांना 2 विरुद्ध 12 मते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी पोंक्षे यांनी अन्सारी यांना विजयी घोषित केले.
निवडीप्रसंगी सुफियाबी युसूफ खान, विजया काळे, मनोज पवार, सलीम शफिउद्दीन, मोहंमद सुल्तान, शेख जावेद शेख सत्तार, इरफान अली, रिजवान खान, जैबुनिस्सा बाकी आदी उपस्थित होते.
महिला बालकल्याण सभापती-उपसभापती निवड अविरोध
महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापतिपदाची निवड प्रक्रिया बुधवारी घेण्यात आली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आला असल्याने सभापतिपदी कॉँग्रेसच्या सबीहाबानो जमील अहमद यांची, तर उपसभापतिपदी शगुफ्ता शफीक शेख यांची अविरोध निवड करण्यात आली.