आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढिगारे टाकू नका रे, आयुक्तांची तंबी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - इमारतींचे बांधकाम करताना उरलेले ढिगारे रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या भूखंडावर टाकणार्‍यांना आता चाप बसणार आहे. त्यासाठी आयुक्तांनी धोरण निश्चित केले असून, बांधकाम विकासकाकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहे. त्यानुसार आता टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट कशी लावणार याची माहितीच द्यावी लागणार आहे. त्याशिवाय महापालिकेकडून हेल्पलाइनदेखील सुरू केली जाणार आहे.

‘येथे माती, विटा, दगड, सिमेंट इ. वस्तू टाकण्यास प्रतिबंध असून, टाकणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,’ अशी सक्त ताकीद देणारे फलक जागोजागी झळकावूनही नेमके त्याच ठिकाणी बांधकाम साहित्य टाकले जाते. यामुळे रस्ते, मोकळ्या भूखंडावरील समस्यांत वाढ झाली होती. विशेषत: नासर्डी नदीच्या पात्रातही अशा प्रकारचे साहित्य आणून टाकले जात असल्याने नदीचे पात्रदेखील अरुंद झाले आहे. पंचवटी, जुने नाशिक, मुंबईनाका, नाशिकरोडमधील जेलरोड, सायखेडारोड, पंचवटीत दिंडोरी व पेठरेाड, हिरावाडीरोड या भागात मोठय़ा प्रमाणावर बांधकाम विकासकांकडून उरलेले बांधकाम साहित्य आणून टाकले जात आहेत. यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी महासभेत ही बाब वारंवार निदर्शनास आणून दिल्याने महापालिका आयुक्तांनी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याबाबत त्यांनी नगररचना व बांधकाम तसेच आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांना एकमेकांशी समन्वय साधून यापुढे बांधकाम साहित्य आणून टाकले जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्य विभागाच्या आरोग्य स्वच्छता निरीक्षकांना याकामी अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे. अशाप्रकारे साहित्य आणून टाकणार्‍यांवर नजर ठेवून संबंधितांवर दंड ठोठावण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

प्रतिज्ञापत्रानंतरच परवानगी : खराब बांधकाम साहित्याची योग्य विल्हेवाट लावण्याविषयी विकासकाकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहे. त्याशिवाय बांधकामाची परवानगी दिली जाणार नाही.

हेल्पलाइन आणि स्वच्छता
रस्त्याच्या कडेला व मोकळ्या जागांवर टाकलेल्या बांधकाम साहित्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. अशा प्रकारचे साहित्य आणून टाकणार्‍यांवर वचक बसविण्यासाठी सुरू करण्यात येणार्‍या हेल्पलाइनवर नागरिकांनी आपले नाव जाहीर न करता माहिती दिल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई केली जाईल. संजय खंदारे, आयुक्त, महापालिका

नैसर्गिक प्रकोपाची भीती
गंगापूर धरणात साठलेला गाळ काढून नेण्याची मोहीम राबविण्यात आली. शेतकर्‍यांना हा गाळ नेण्यास परवानगी देण्यात आली. परंतु, गाळ काढण्याच्या नावाखाली धरणाच्या क्षेत्रात उत्खनन करून मुरूम व माती वाहून नेण्याचे गंभीर प्रकार सुरू आहेत. यामुळे धरणाला धोका उत्पन्न होणार असून यातून उत्तराखंडमध्ये केदारनाथ येथे ज्याप्रकारे नैसर्गिक प्रकोप झाला तसा प्रकार येथे होण्याचा धोका उद्भण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

अमूल्या संस्थेची घेणार मदत
शहरात अस्वच्छता करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने नेमलेल्या ‘अमूल्या’ क्लिनअप संस्थेला नगरसेवकांचा विरोध असला तरी या संस्थेचा उपयोग बांधकामांच्या अवशेषांना चाप लावण्याच्या मोहिमेसाठी होणार आहे. त्यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांची ठिकठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे.