आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेत संधिसाधूंची ‘रिंग’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कुंभमेळा तोंडावर आला असताना ‘संकट हीच संधी’ मानून ठेकेदारांनी प्रशासनाला हतबल करण्याजाेगी परिस्थिती निर्माण करून जादा दराने काम मिळविण्यासाठी सुरू केलेली रिंग सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे, प्रशासनातील काही अधिकारी या रिंगमध्ये सामील असल्याचे वृत्त असून, प्रथम निविदांकडे पाठ फिरवायची त्यानंतर तातडीची गरज म्हणून हेच काम करण्यासाठी ४० टक्क्यांपेक्षाही जादा दराच्या निविदा पाठवून फायदा उचलायचा, असा नवीन फंडा राबवला जात असल्याचे विदारक चित्र काही प्रस्तावांमधून समोर आले आहे, अशी कामे मंजूर करण्यासाठी ‘रात्रीचा दरबार’ भरवण्यापर्यंत मजल गेल्याचे वृत्त आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या कोट्यवधींची कामे तातडीची बाब म्हणून मार्गी लावण्यासाठी खुद्द आयुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी रात्र आणि दिवस एक केला आहे. मात्र, ही वेळ त्यांच्याच हाताखालच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांशी संगनमत करून आणल्याची चर्चा पालिकेत सुरू झाली आहे. त्यासाठी काही महिन्यांपासून पद्धतशीरपणे प्रयत्न झाले असून, त्याची प्रचिती पालिकेने स्थायी समितीवर ठेवलेल्या काही प्रस्तावावरून येत आहे. यात साेपे तंत्र वापरले असून, रिंग करून प्रथम कामे घेण्यासाठी अनुत्सुकता दाखवायची काम अति तातडीचे झाले की, ४० टक्क्यांहून अधिक दराने हेच काम करण्यासाठी तयारी दाखवायची. त्यानंतर अधिकारी स्वत:चे वजन दाखविण्यासाठी संबंधितांना बाेलावून तडजोड करण्यासाठी प्रयत्न केल्याचे दाखवत आहेत. त्यानंतर ठेकेदारांचा अव्वाच्या सव्वा फुगलेला फुगा एखादी टाचणी लागावी, तसा छोटा होत असून, ४० टक्के जादा दराची कामे गरज बघून कधी आठ टक्क्यांपर्यंत, तर कधी ३५ टक्क्यांपर्यंत कमी होत असल्याचे दिसत आहे. कमी दरात काम करणे ठेकेदाराला परवडत हाेते, तर मग जादा दराची निविदा पाठविण्याची खेळी कशासाठी काेणाच्या इशाऱ्यावरून खेळली जात आहे, याविषयी आता पालिकेत खमंग चर्चा सुरू आहे.
अग्निशामक दलाच्या खरेदीत ठेकेदारांचा खो-खो...
कुंभमेळ्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने अति तातडीची गरज म्हणून रेस्क्यू व्हॅन सामुग्री खरेदी तसेच फ्लड रेस्क्यू व्हॅन खरेदीचे दोन प्रस्ताव स्थायी समितीवर आले आहेत. हे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यासाठी स्थायी समितीवर प्रशासनाने केलेला आटापिटा लपून राहिला नाही.
वास्तविक दोन्ही प्रस्तावांचा अभ्यास केला तर, ठेकेदारांना एकमेकांना खो देत एक काम मी घेताे, दुसरे तू अशी शक्कल तर लढवली नाही ना, अशी शंका उपस्थित होते. इर्मजन्सी रेस्क्यू व्हॅनसाठी ४२ टक्के जादा दराची निविदा असताना तडजोडीनंतर हेच काम टक्क्यांनी करण्यासाठी तयारी दाखवली गेली. यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ठेकेदाराची ५० टक्के जादा दराची निविदा बाद झाली. मात्र, याच ठेेकेदाराला फ्लड रेस्क्यू व्हॅन मात्र ५९ टक्के जादा दराचा प्रस्ताव असताना तडजोडीअंती ७.५ टक्के जादा दराने मिळेल असे चित्र आहे.
विशेष म्हणजे, रेस्क्यू व्हॅन टक्के खरेदी करण्याची तयारी दाखवणारा पहिला ठेकेदार येथे तृतीयस्थानी असून, त्याची ६६ टक्के जादा दराची निविदा आहे. त्यामुळे प्रथम जादा दराने निविदेसाठी दबाव निर्माण करायचा त्यानंतर वाटाघाटी करून हीच कामे सोयीने मिळवायची, असा फंडा तर राबवला जात नाही ना, अशा संशयाला जागा निर्माण झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...