आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिकरोडमध्ये ‘सिंघम’चा वचक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - मागील दोन महिन्यांपासून नाशिकरोड परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा पोलिसांविषयी विश्वास वाढला आहे.
पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त डॉ. डी. एस. स्वामी व गणेश शिंदे या दोन अधिका-यांनी धडक मोहीम हाती घेतल्याने गुन्हेगारांना वचक बसलाच आहे. शिवाय गुन्हेगारी रोखण्यासाठी जनतेनेही पुढाकार घेत अधिका-यांशी थेट संपर्क करण्यास सुरुवात केली आहे. जनतेने तर डॉ. स्वामी यांना ‘सिंघम’ ही पदवीच बहाल केली असून, गुन्हेगारांनाही या ‘सिंघम’ने धडकी भरते आहे.
अतिसंवेदनशील समजल्या जाणा-या नाशिकरोड शहरात दैनंदिन चो-या, मारामा-या, लूटमार, महिलांना त्रास, अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला होता. राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिस या वाढत्या घटनांकडे डोळेझाक करत होते. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता मात्र रात्री-बेरात्री सुरू असलेले दुकाने, अवैध धंदे रात्री 9.45 वाजेपूर्वीच बंद होत असल्याने शहरात सायंकाळनंतर तुरळक वर्दळ दिसून येते. नाशिकरोड पोलिस ठाण्यात यापूर्वी तक्रारदारांची गर्दी होत होती. आता दिवसभरात अपवादात्मक एखादा गुन्हा दाखल होत असल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. गुन्हेगारीसोबतच डॉ. स्वामी व शिंदे यांनी वाहतूक व्यवस्थेलाही शिस्त लावल्याने परिसरातील रिक्षावाल्यांची अरेरावी नियंत्रणात आली आहे.
दिवसाला 120 पेक्षा अधिक फोन - निर्धास्तपणे पोलिसांना फोन करा, अवघ्या पाच मिनिटात पोलिस घटनास्थळी हजर होईल, असे आश्वासन सहायक आयुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी नागरिकांना केले होते. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, नागरिकांनी त्यांना दूरध्वनी करून गुन्ह्यांविषयी व गुन्हेगारांविषयी माहिती देण्यास सुरुवात केली आहे. डॉ. स्वामी यांना यासंदर्भात जवळपास 120 पेक्षा अधिक फोन दररोज येत आहेत.
प्रत्येकाच्या तोंडी ‘सिंघम’ - नाशिकरोड परिसरात टोळक्यांचा मोठा वावर असे. रात्री-अपरात्री कोणीही हटकत नसल्याने टपोरीगिरी करण्यावर त्यांचा भर होता. रात्री उशिरा आलेल्या प्रवाशांना याचा त्रास होत. डॉ. स्वामी यांनी अशा टोळक्याचा योग्य तो बंदोबस्त केला आहे. या टोळक्यांच्या मनात पोलिसांविषयी वचक निर्माण झाला असून, त्यांनी डॉ. स्वामी यांना ‘सिंघम’ हे नाव दिले आहे.