आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Corporation Area Will Increase In Akola News In Divya Marathi

महापालिकेच्या क्षेत्रफळात अाता होणार चारपटीने वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेच्या हद्दवाढ प्रकरणाने आता गती घेतली आहे. सोमवारी अमरावती विभागीय कार्यालयात काही सोपस्कार केल्यानंतर हे प्रकरण नगररचना विभागाच्या पुणे येथील मुख्य कार्यालयात दाखल केले जाणार आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत हद्दवाढ निश्चित मानली जात असून, २८ चौरस किलोमीटरचे महापालिकेचे क्षेत्रफळ या हद्दवाढीने १२४.२२ चौरस किलोमीटर होणार आहे, तर लोकसंख्येतही सव्वा लाखाने वाढ होईल.

महापालिका अस्तित्वात आल्यापासून महापालिकेची हद्दवाढ प्रस्तावित आहे. आतापर्यंत आलेल्या जवळपास सर्वच आयुक्तांनी हद्दवाढीसाठी प्रयत्न केले. परंतु, या वेळी लोकप्रतिनिधी तसेच पालकमंत्री अनुकूल असल्याने या प्रकरणाने गती घेतली आहे. दिव्य मराठीने याबाबत सर्वप्रथम वृत्त प्रकाशित केले होते. महापालिका प्रशासनाने या अनुषंगाने नव्याने प्रस्ताव तयार केला आहे. वाढणारी लोकसंख्या, क्षेत्रफळ, उत्पन्न, दरडोई क्षेत्र आदींचा समावेश आहे. नगररचना विभागाच्या वतीने सोमवारी अमरावती विभागीय कार्यालयात माहिती सादर केल्यानंतर नगररचना विभागाच्या पुणे येथील मुख्य कार्यालयात प्रकरण सादर केले जाणार आहे. पुणे येथील नगररचना कार्यालयाने अहवाल दिल्यानंतर मंत्रालयात हे प्रकरण दाखल करण्यात येईल. त्यानंतर अधिसूचना, हरकती आदी मागवल्या जातील. पुढील वर्षी मनपाची सार्वत्रिक निवडणूक आहे. या निवडणुकीच्या तयारीच्या आधी हद्दवाढ झाल्यास प्रभाग रचना करणे महापालिकेला सोईचे होणार आहे. त्यामुळेच येत्या मे अथवा जूनपर्यंत शहरालगतची उपनगरे तसेच ग्रामपंचायतींचा समावेश महापालिका क्षेत्रात केला जाण्याची शक्यता आहे.

नगरसेवकांच्यासंख्येतही होणार वाढ :
तूर्ताससहा हजार लोकसंख्येमागे एक नगरसेवक आहे. या अनुषंगाने वाढणाऱ्या लोकसंख्येनुसार नगरसेवकांची संख्या ७३ वरून ९१ होऊ शकते. परंतु, हद्दवाढीनंतर याच नियमानुसार नगरसेवकांची संख्या निश्चित केली जाईल, असे नाही.

भौरदगावाचा प्रश्न निकाली :
हद्दवाढीत महापालिका क्षेत्रालगत भौरद ग्रामपंचायतीचे क्षेत्र आहे. परंतु, हद्दवाढीच्या यादीत भौरद गावाचा समावेश नव्हता. ही बाब दिव्य मराठीने सर्वप्रथम प्रकाशित करून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. आता यावर प्रशासनाने तोडगा काढला आहे. हद्दवाढीत मौजे भौरदचा समावेश नाही. परंतु, जी उपनगरे भौरद ग्रामपंचायत क्षेत्रात येतात, त्या भागाची नावे मौजे सुकापूर, तापलाबाद अशी आहे. या गावांचा समावेश हद्दवाढीत असल्याने भौरद मूळ गाव वगळता महापालिकालगतची वस्ती जोडली जाणार आहे.

लोकसंख्येतहोणार सव्वा लाखाने वाढ :
२०११च्या जनगणनेनुसार या २४ गावांची लोकसंख्या एक लाख ११ हजार ३४० आहे. त्यामुळे या गावांचा समावेश महापालिकेत झाल्यास २०११ च्या जनगणनेनुसार महापालिका क्षेत्राची लोकसंख्या पाच लाख ३७ हजार १५७ होईल.