आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका सभापतिपद अनिश्चितच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - स्थायी समिती सभापतिपदासाठी दोन्ही पक्षातील नेत्यांच्या चर्चेनुसार शिवसेनेने मनसेला पाठिंबा देण्याचे निश्चित केल्याचा दावा मनसेचे आमदार तथा प्रदेश चिटणीस वसंत गिते यांनी केला आहे. दुसरीकडे, शनिवारी होणार्‍या निवडणुकीत मनसेला रोखण्यासाठी भाजप व शिवसेनेच्या गोटातून हालचाली सुरू झाल्याचे समजते.

गेल्या निवडणुकीत मनसेचे उमेदवार अशोक मुर्तडक यांना सर्वपक्षीय आघाडीमुळे स्थायी समिती सभापती निवडणुकीत पराभूत व्हावे लागले. त्यांना यंदा सभापती करण्यासाठी मनसेने कंबर कसली असून सद्यस्थितीत मुर्तडक यांच्याबरोबर रमेश धोंगडे यांनाही उमेदवारीची संधी आहे. प्रभाग समिती निवडणुकीत शिवसेनेशी झालेली सोयरिक स्थायी सभापती निवडणुकीतही ठेवण्यासाठी मुंबईत मनसे व शिवसेना आमदारांची बैठक झाली. त्यात मनसेला पाठिंबा देण्याची तयारी शिवसेनेने दर्शवल्याचे गिते यांनी सांगितले.

फोडाफोडीसाठीही प्रयत्न

शिवसेनेने पाठबळ उभे केले असले तरी ऐनवेळी काहीही होण्याची शक्यता एका ज्येष्ठ नगरसेवकाने व्यक्त केली. मनसेकडून मुर्तडक व धोंगडे या दोघांचे अर्ज असून यातील कोण माघार घेते, यावर समीकरण अवलंबून आहे. दोन्ही उमेदवार महत्त्वाकांक्षी असल्यामुळे ज्याला डावलले जाईल त्यालाच उमेदवार बनवून पाठिंबा देण्याचीही खेळी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. खासकरून, ‘कास्ट कार्ड’चा त्यासाठी प्रचार केला जात असल्यामुळे मुद्दा नाजूक होण्याची शक्यता आहे.

चर्चेला आले उधाण
सभापतीपदासाठी नऊ अर्ज दाखल झाले आहेत. मनसे, शिवसेना व भाजपचे प्रत्येकी दोन; तर रिपाइं, अपक्ष व काँग्रेसच्या प्रत्येकी एका सदस्याने अर्ज दाखल केले असून एवढय़ा मोठय़ा प्रमाणात प्रथमच अर्ज दाखल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. सायंकाळपर्यंत शिवसेना-मनसे स्वतंत्र लढण्याची चर्चा सुरू असतानाच मुंबईत झालेल्या बैठकीत मनसेला पाठिंबा देण्याच्या निर्णयानंतर निवडणूक अविरोध होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
हे आहेत उमेदवार
मनसे : अशोक मुर्तडक, आर. डी. धोंगडे
शिवसेना : शिवाजी सहाणे, सूर्यकांत लवटे
भाजप : बाळासाहेब सानप, सीमा हिरे
रिपाइं : प्रकाश लोंढे

अपक्ष : शबाना पठाण
कॉँग्रेस : शिवाजी गांगुर्डे