आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल दीड कोटींचे खानपान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तिजोरीतील खडखडाटामुळे एकीकडे महत्वाची कामे रखडली असताना केवळ खानपानापोटी मागील काळात दीड कोटी रुपयांचा चुना पालिकेला लागल्याचे स्थानिक निधी लेखापरीक्षा विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. हा खर्च शिवसेना- भाजप युतीच्या काळातील असून, यातील एक महिन्याचा कार्यकाळ मनसेचे महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांचा आहे.

पाच लाखाची मर्यादा असताना वार्षिक समारंभावर 25 लाख तर, आकस्मिक खर्चातून खानपान व पुष्पगुच्छापोटी तब्बल 1 कोटी 4 लाखाचा खर्च झाला आहे. विशेष म्हणजे, यातील केवळ 68 लाखाचा हिशोबच लेखापरीक्षकांना उपलब्ध झाला. 35 लाख 82 हजाराचे नेमके काय झाले याचे कोडे अद्यापही कायमच आहे.

सन 2011-12 या अर्थिक वर्षातील लेखापरीक्षण अहवाल मागील आठवड्यातील महासभेवर मंजुरीसाठी सादर झाला. त्यातून पालीकेच्या तिजोरीत खडखडाट होण्यामागची प्रमुख कारणे समोर आली आहे. वार्षिक समारंभासाठी जनसंपर्क विभागाने 24 लाख 84 हजार 573 रूपयांचा खर्च केला. वस्तुत: या खर्चासाठी केवळ 5 लाखाचीच मर्यादा आहे. त्यातही 1 लाखापेक्षा अधिक खर्च झाल्यास शासनाची मंजुरी घेण्याची अट आहे. त्यामुळे 5 लाखाची मर्यादा वगळून 19 लाख रूपयांचा खर्चावर आक्षेप घेतला आहे. त्यापेक्षाही गंभीर म्हणजे, अल्पोपहार व पुष्पगुच्छांकडे बघता येईल. त्यावर 68 लाख 21 हजार रूपये खर्च झाले असून त्यात नाश्ता-चहावर 50 लाख 63 हजार तर, शाल-पुष्पहारावर 17 लाख 57 हजार रूपयांचा खर्च झाला आहे.

मेहरबानी कोणावर?
महासभा, स्थायी समिती सभेवर खानपानापोटी व समारंभासाठी होणारा खर्च आकस्मिक नसतो. त्याची कल्पना असल्यामुळे दरपत्रके वा निविदा पद्धतीने पुरवठादार निवडणे अपेक्षित होते असे स्पष्ट मत लेखापरीक्षकांनी व्यक्त केले आहे. प्रत्यक्षात मात्र, यापद्धतीला फाटा दिल्यामुळे विशिष्ट पुरवठादारासाठीच खटाटोप झाला की काय, अशीही शंका व्यक्त केली जात आहे.
बदली रजेला फाटा ; 19 लाखांचा ओव्हरटाइम
1980 पासून कर्मचार्‍यांना सुटीच्या दिवशी काम केल्यास ओव्हरटाइमची योजना बंद झाली आहे. त्याऐवजी बदली सुटीची तरतूद आहे; मात्र महापौर यांचे स्वीय सहायक तसेच नगररचना विभागातील अधिकारी- कर्मचार्‍यांना 19 लाख रुपयांचा ओव्हरटाइम दिला गेला. त्यासाठी महासभेची मान्यता घेऊन आयुक्तांनी अंमलबजावणी केली.