नाशिक-महापालिकेचा पहिला सुसज्ज शॉपिंग मॉल जुन्या नाशकातील महात्मा फुले मंडईच्या जागेवर उभारण्यात येणार आहे. खासगीकरणांतर्गत होणार्या या चार मजली मॉलसाठी 25 कोटी खर्च येणार असून, या ठिकाणी चारशे व्यावसायिकांना उत्पन्नाचे साधन प्राप्त होणार आहे. मॉलसाठीच्या जागेची पालिका आयुक्त संजय खंदारे यांनी पाहणी केली असून, लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. महात्मा फुले मंडईची दुरवस्था झाली आहे. मंडईच्या या इमारतीचे नूतनीकरण न करता या ठिकाणी शॉपिंग मॉल उभारण्यात यावा, असा प्रस्ताव नगरसेवक सुफी जीन व समीना मेमन यांनी सादर केला होता.
मॉलद्वारे होणार रोजगारनिर्मिती!
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महात्मा फुले मार्केटची दुरवस्था झाली आहे. येथे नागरिकदेखील खरेदीसाठी येत नाहीत. या ठिकाणी चार मजली शॉपिंग मॉल तयार करण्यात यावा, असा प्रस्ताव महासभेत दिला होता. या ठिकाणी आयुक्तांकडून पाहणीदेखील झाली आहे. हे काम लवकरच सुरू होणार असून, यामुळे हजारो नागरिकांना रोजगार मिळणार आहे. समीना मेमन, नगरसेविका
असा राहणार सुसज्ज शॉपिंग मॉल
शॉपिंग मॉलच्या या इमारतीत 12 हजार 563 चौरस फुटांची बेसमेंट पार्किंग, पहिल्या मजल्यावर दुचाकीसाठी वाहनतळ, तिसर्या मजल्यावर 397 गाळे, 8-10 आणि 10-15 लांबीचे हे गाळे राहतील, या चार मजली इमारतीत चार लिफ्ट व चार मुख्य प्रवेशद्वार राहतील.
खासगीकरणामार्फत होणार कामे
महात्मा फुले मंडईच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव आला होता. त्या ठिकाणी शॉपिंग मॉल करण्याची मागणी होती. आयुक्तांकडून पाहणी झाली असून, या ठिकाणी सर्व कामे खासगीकरणातून होणार आहेत. आर. डी. धारणकर, अभियंता, बांधकाम विभाग