आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवकाविरुद्ध झाले पर्यावरणप्रेमी आक्रमक, ‘ग्रीन टेररिस्ट’वरून राष्ट्रवादीचे सचिन महाजन यांना नाेटीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गोदावरीत गटारयुक्त पाणी मिसळत असल्याचे खोटे फोटो टाकून काही ‘ग्रीन टेररिस्ट’ स्वत:चे उखळ पांढरे करीत आहेत, असे आरोप करून गोदावरी गटारीकरणविरोधी मंचचे निशिकांत पगारे राजेश पंडित यांच्याविरोधात महासभेत आरोपांच्या फैरी झाडणारे राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन महाजन यांच्यावर मानभंगाचा दावा ठोकण्याची तयारी सुरू झाली आहे. पगारे पंडित यांनी वकिलांमार्फत महाजन यांना कायदेशीर नोटीस पाठवून वक्तव्याविषयी जाहीर माफी महासभेत खुलासा करण्याची मागणी केली आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या महासभेत स्मार्ट सिटीच्या विषयावर चर्चा सुरू असताना अचानक नगरसेवक महाजन यांनी पर्यावरणप्रेमींच्या नावाखाली शहरात ‘ग्रीन टेररिस्ट’ सक्रिय झाल्याचा आरोप केला होता. हे ‘ग्रीन टेररिस्ट’ पर्यावरणप्रेमाच्या नावाखाली अनेक चांगल्या विकासाच्या योजनांमध्ये खीळ घालत आहेत. त्यांना वेळीच लगाम घालण्याची गरज असून, यातील काही ‘टेररिस्ट’ गोदावरीत गटारयुक्त पाणी कसे सर्रास मिसळतेय याचे खोटे फोटो फेसबुकवर टाकून दिशाभूल करीत आहेत. मात्र, चाणाक्ष आयुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी फोटोची खातरजमा केल्यावर ते अलाहाबाद येथील असल्याचे लक्षात आले. डाॅ. गेडाम यांनी ही दिशाभूल तत्काळ पोस्ट टाकून नदिर्शनास आणून दिल्यावर धाबे दणाणलेल्या ‘ग्रीन टेररिस्ट’ने फोटो काढून घेतल्याचा दावा महाजन यांनी केला होता.

या वेळी बोलण्याच्या ओघात महाजन यांनी पगारे पंडित यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले होते. त्यात पंडित यांना महावदि्यालयातून कसे काढून टाकले, या विषयावर प्रकाश टाकला होता. महासभेतील आरोपांनंतर अनेकांनी फोन करून बदनामीकारक वृत्ताविषयी विचारणा केली. त्यामुळे व्यथित झालेल्या पंडित पगारे यांनी महाजन यांच्याविरोधात कायदेशीर लढाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी अॅड. धीरज पोंक्षे यांच्यामार्फत महाजन यांना मानभंगाची नोटीस पाठवली आहे.

दिवाणी दावा नुकसानभरपाईची मागणी केली जाणार असल्याचेही पंडित पगारे स्पष्ट केले आहे. महाजन यांना आठ दिवसांच्या आत प्रसारमाध्यमे वृत्तवाहिन्यांमधून जाहीर माफीसाठी मुदत देण्यात आली असून, महासभेतही खुलासा करावा, असेही म्हटले आहे. दरम्यान, यासंदर्भात महाजन यांनी कायदेशीर नोटीस प्राप्त झाल्यानंतर योग्य उत्तर दिले जाईल, असे "दिव्य मराठी'शी बोलताना सांिगतले.