आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फायली अडकल्याने सेना नगरसेवकांचा ठिय्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तिजोरीतील खडखडाट व अन्य कारणांमुळे सत्ताधारी मनसे मेटाकुटीला आली असताना, प्रभारी आयुक्त जुन्या फायली निकाली काढत नाही व दुसरीकडे कायमस्वरूपी आयुक्त नसल्याने नवीन फायलीही मार्गी लागत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या नगरसेवकांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. पालिकेचे मुख्य द्वारही त्यांनी बंद केल्याने नागरिकांनाही फटका बसला.

महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असतानाही अंदाजपत्रक 3,500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आयुक्तांनी शिफारस केलेल्या अंदाजपत्रकातून कसेबसे 1800 कोटींची कामे होण्याचा अंदाज आहे. एलबीटीमुळे उत्पन्न घटले असताना, अनेक विकासकामांच्या फायली पडून आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना कामे होत नसल्याने नगरसेवक मेटाकुटीला आले आहेत. अशातच प्रभारी आयुक्त संजीवकुमार हे जुन्या फायलींना हात लावत नसल्याची तक्रार करत शिवसेनेचे नगरसेवक शैलेश ढगे व सचिन मराठे यांनी आंदोलन केले. दुपारी साडेतीन वाजता त्यांनी प्रवेशद्वावर ठाण मारत घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. त्यांना पाठीमागच्या दरवाजातून प्रवेश करावा लागत होता. या वेळी नितीन विखार, चंद्रशेखर सरोदे, राजेंद्र देशमुख, रामा वाघ, प्रमोद फडोळ दिनेश दास, गणेश गडाख आदी उपस्थित होते.
सेना नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ
शिवसेना-रिपाइंचे पालिकेत 22 संख्याबळ असून, त्यातील केवळ दोनच नगरसेवक उपस्थित होते. आंदोलन सुरू झाल्यानंतर महानगरप्रमुख तथा गटनेते अजय बोरस्ते यांनी हजेरी लावली. विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर हे नगरसेवक सलीम शेख यांच्या मातोश्रीच्या अंत्यविधीत असल्यामुळे अनुपस्थित होते. दरम्यान, अनेक नगरसेवकांनी आंदोलनाविषयी माहितीच नसल्याचे सांगितले. त्यामुळे आंदोलन वैयक्तिक की, पक्षाचे असा प्रश्न निर्माण झाला.