आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवकांचे एकामागे एक ठिय्या आंदोलन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुने नाशिक - नाशिक पूर्व प्रभाग सभा शनिवारी विविध समस्यांच्या चर्चेने गाजली. वारंवार तक्रारी करूनही मनपा अधिकारी दुर्लक्ष करतात, पूर्व विभागातील कित्येक समस्यांनी नागरिक हैराण झाले असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. ‘आमची कामे का करत नाही’ असा सवाल करून एकामागून एका नगरसेवकाने सभेत ठिय्या आंदोलन करून संताप व्यक्त केला. प्रभागाच्या आरोग्याच्या विषयावर नगरसेवक अधिकार्‍यांवर आक्रमक झाले.

नगरसेविका मेघा साळवे यांनी सभेत ठिय्या आंदोलनाची सुरुवात करून घंटागाडी व धूरफवारणी होत नसल्याने घंटागाडीचा व पेस्टकंट्रोलचा ठेका रद्द करावा, अशी मागणी केली. दरम्यान, या बैठकीत प्रथमच जादा विषयांसह तब्बल 95 लाखांची विकासकामांना मंजुरी देण्यात आली.

साळवे यांच्यापाठोपाठ नगरसेविका रंजना पवार यांनी बांधकाम विभागावर ताशेरे ओढले. रस्त्यातील खड्डे बुजवण्यासाठी मुरूम टाकताना ट्रकचे बिल लावून ट्रॅक्टरवर काम भागविले जाते. डांबर खडी नित्कृष्ट दर्जाची असल्याचा आरोपही त्यांनी केला. तर प्रभागात स्वच्छताच होत नसल्याचा आरोप नगरसेवक प्रा. कुणाल वाघ यांनी केला. ठिकठिकाणी घाणीमुळे डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याबद्दल नाराजी व्यक्त करून ठिय्या देत त्यांनी अधिकार्‍याकडून लेखी उत्तर मागितले. नगरसेविका रंजना पवार यांनीही आधिकार्‍यांच्या कामांबद्दल नाराजी व्यक्त केली.

प्रभागातील कामांच्या तक्रारीवर पाणीपुरवठा अधिकार्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप नीलिमा आमले यांनी केला. प्रभागात नालेसफाई होत नाही, तोडलेल्या झाडांचा कचरा उचलला जात नाही, असा आरोप डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी केला. बैठकीसाठी अधिकारी गैरहजर राहिल्याबद्दल सर्वच नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. सभापती समीना मेमन व विभागीय अधिकारी पोपटराव बागुल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस नगरसेविका वत्सला खैरे, अर्चना थोरात, सुमन ओहोळ, यशवंत निकुळे आदी उपस्थित होते.

जास्त लोकसंख्या व कमी कर्मचारी
पूर्व विभागाच्या एकूण 12 प्रभागांतील लोकसंख्या जवळपास चार लाख आहे. मात्र या सर्वांसाठी प्रत्येक विभागात मोजकेच कर्मचारी आहेत. स्वच्छता विभागात 100, ड्रेनेज विभागात फक्त 20 कर्मचारी आहेत. काही कर्मचारी व अधिकारी यांची जकात विभागासाठी नेमणूक केली आहे. प्रचंड कामाचा व्याप वाढल्याने कामे रखडली आहेत. मात्र अधिकारी काम करीत नसल्याची ओरड करणारे नगरसेवक कर्मचारी वाढविण्यासंदर्भात काहीही बोलत नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. विविध ठिकाणी विकासकामाचे ठेके घेणारे नित्कृष्ट काम करीत आहेत. ते बहुतेक जण नगरसेवकांच्या र्मजीतील असल्यामुळे ओरड होत नसल्याची दबक्या आवाजात चर्चा होते.

अगोदर पालिका इमारत स्वच्छ करा
नाशिक महापालिकेची सर्वात जुनी इमारत म्हणजे पूर्व विभागाची ओळख आहे. परंतु पालिकेच्या या इमारतीमध्ये नेहमीच प्रचंड प्रमाणात अस्वच्छता असते. अगोदर या इमारतीचे नूतनीकरण करा, त्यातला घाण-कचरा साफ करा, त्यानंतर शहराचा विकास करा, अशा शब्दांत वत्सला खैरे यांनी या बैठकीत नाराजी व्यक्त केली. यावेळी राहुल दिवे म्हणाले की, खरे अतिक्रमण पालिकेच्या आवारातच जास्त आहे, अगोदर ते अतिक्रमण काढा, नंतर इतर ठिकाणी कारवाई करा.