आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंचवटी तरणतलावात भ्रष्टाचाराचा पाझर, पाण्यावरून गरमागरमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्थायी समिती बैठकीत मनसेचे नगरसेवक यशवंत निकुळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महापालिका उपायुक्त रोहिदास बहिरम. - Divya Marathi
स्थायी समिती बैठकीत मनसेचे नगरसेवक यशवंत निकुळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महापालिका उपायुक्त रोहिदास बहिरम.
नाशिक - महापालिकेने‘ना नफा-ना ताेटा’ या तत्त्वावर तरणतलावांचे व्यवस्थापन करणे अपेक्षित असताना, पंचवटी तरणतलावात मात्र ठेकेदाराकडून अव्वाच्या सव्वा रक्कम घेऊन नफा कमावला जात असल्याची तक्रार स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात अाली. खुद्द सभापती शिवाजी चुंभळे यांनीच प्रतिव्यक्तीमागे एक हजार रुपये अाकारून पालिकेला ४००, तर ठेकेदार स्वतःकडे ६०० रुपये ठेवून घेत असल्याचा गाैप्यस्फाेटही केला. त्यानंतर या प्रकरणाची चाैकशी करावी मुदत संपल्यानंतर सर्वच तरणतलावाचे व्यवस्थापन महापालिकेने करावे, असे आदेशही त्यांनी दिले.
तरणतलावावरील जीवरक्षकाला मुदतवाढ देण्याचा विषय चर्चेसाठी अाला असताना, यशवंत निकुळे यांनी तरणतलाव नेमके काेण चालवते, त्याचे अर्थकारण काय, पालिकेचा फायदा काय, याची माहिती मागितली. त्यानंतर मात्र नगरसेवकांनी तरणतलावाच्या व्यवस्थापनातून हाेणाऱ्या खाबुगिरीवर टीका केली. प्रा. कुणाल वाघ यांनी पाच लाख रुपये ठेकेदाराला देऊन त्याबदल्यात नेमका फायदा काय हाेताे, असा सवाल केला.

त्यानंतर सभापती चुंभळे यांनी महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तरणतलावावर काम करत असताना ठेकेदाराला पैसे देण्याचे कारण काय, असा जाब उपस्थित अधिकाऱ्यांना विचारला. ठेकेदाराकडून हाेणाऱ्या अनियमिततेबाबत अाराेप करत तत्काळ ठेक्याची चाैकशी करावी मुदत संपल्यानंतर पालिकेने तरणतलाव चालवावे, असे अादेशही दिले.

भुजबळांवरून दिवे-चुंभळेंमध्ये टाेलेबाजी
भुयारीगटार याेजनेच्या कामासाठी निधी देण्याच्या प्रस्तावावरून दिवे चुंभळे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. टाकळी परिसरातील मलजलशुद्धीकरणामुळे घाण, दुर्गंधी अनाराेग्याचे संकट अाल्याकडे लक्ष वेधत दिवे यांनी हे सर्व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतःच्या घराजवळील मलजलशुद्धीकरण केंद्र टाकळीला हलवल्याचा परिणाम असल्याचा अाराेपही केला. त्यास चुंभळे यांनी हरकत घेतली.

पालिका बाजार गाळ्यांचा प्रस्ताव पुन्हा भिजत
पालिकाव्यापारी संकुलातील भाड्याने दिलेल्या गाळ्यांना मुदतवाढ द्यायची की ते खाली करून रेडीरेकनरनुसार लिलावाद्वारे वाटप करायचे, हा प्रस्ताव तहकूब ठेवण्यात अाला. याबाबत पूर्ण माहिती नसल्याचे कारण दिले गेले.

गंगापूर धरणात मुबलक पाणी असताना शहरात कमी दाबाने खंडित पाणीपुरवठ्याचे कारण काय, असा सवाल सुरेखा भाेसले, राहुल दिवे यांनी केला. त्यानंतर बहुतांश नगरसेवक अाक्रमक झाले. पाणीपुरवठ्याच्या याेजनांना निधीची कमतरता असल्याचा बचाव अधिकाऱ्यांनी केला. मात्र, रंजना भानसी अन्य नगरसेवकांनी स्वनिधी देऊनही कामे हाेत नसल्याची तक्रार केली.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांना महापर्वणीच्या कालावधीत पुरवल्या जाणाऱ्या १५ काेटी रुपयांच्या तात्पुरत्या शाैचालयांवरून गरमागरमी झाली. या शाैचालयांमधील मैला पर्वणीचा दिवस संपल्यानंतर उर्वरित दिवसात काेण, असा सवाल करत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वास्तविक १५ हजार रुपये याप्रमाणे एक असे तात्पुरते शाैचालय उभारण्याएेवजी १२ ते १४ हजारांत कायमस्वरूपी शाैचालय उभारण्याकडे काणाडाेळा का झाला, असा नगरसेवकांचा प्रश्न हाेता. या मुद्यावर चर्चा अपेक्षित असताना अचानक त्यास बगल देत किरकाेळ सुधारणा करण्याच्या अटीवर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात अाली.

बातम्या आणखी आहेत...