आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोबोटिक खरेदीत काळंबेरं, नगरसेवकाचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गोदावरी स्वच्छतेसाठी साडेसतरा कोटींची रोबोटिक मशीन खरेदी शंकास्पद असून, सध्या सुरू असलेला पाण्यावरील घंटागाडीचा उपक्रमच योग्य असल्याचा दावा नगरसेवक विक्रांत मते यांनी करीत यंत्र खरेदीपूर्वी चर्चा न करता प्रशासन व सत्ताधार्‍यांना विषय मंजुरीची घाई का झाली, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

गुरुवारी गोंधळात पार पडलेल्या महासभेत गोदा स्वच्छतेसाठी रोबोटिक मशीन खरेदीचा विषय मंजूर करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर विक्रांत मते यांनी पाण्यावरील घंटागाडीतूनच घारपुरे घाट ते संत आसारामबापू पुलापर्यंत पत्रकारांसमवेत फेरफटका मारत गोदावरीची पाहणी केली. गेल्या 18 दिवसांपासून महापालिकेच्या वतीने तीन घंटागाड्यांमार्फत निर्माल्य आणि पाणवेली काढण्याचे काम सुरू असून, गोदापात्र निर्मळ करण्यात आले आहे. आयुक्तांनी तीन महिन्यांसाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून त्यास मान्यता दिली आहे. त्यातुलनेत काही दिवसांमध्येच कमी खर्चामध्ये गोदावरी स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य होत असल्याचे मते यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले. साडेसतरा कोटींची मशीन खरेदीऐवजी बॅँकेत ही ठेव ठेवल्यास त्यापासून महिन्याला साडेसतरा लाखांचे व्याज मिळू शकते. त्यातून हा खर्च भागविला जाऊ शकतो. आजमितीस तीन घंटागाड्यांसाठी 2 लाख 34 हजार इतका खर्च येत आहे. मुंबईसारख्या महानगरात दोन रोबोटिक मशीन आहेत. त्यातुलनेत नाशिकला दोन मशिनरी घेण्याची महापालिका घाई करीत आहे. त्याकरिता या विषयावर चर्चा न करताच विषय मंजूर करून नाशिककरांचा कररूपी पैसा पाण्यात घालवत असल्याचा आरोप मते यांनी केला आहे.

शासनाकडे तक्रार करणार

खरेदीसंदर्भात पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहे. मागील दोन वर्षांपूर्वी गोदा स्वच्छतेसाठी शासनाने मशिनरी देण्याचे कबूल केले होते. पालिकेला केवळ इंधन खर्च करावयाचा होता. मात्र, प्रशासनाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. मात्र, आता कोट्यवधींची मशिनरी खरेदीची आठवण सत्ताधार्‍यांना का व्हावी? विक्रांत मते, नगरसेवक


एक तासात पुन्हा निर्माल्य

घारपुरे घाट येथून घंटागाडीतून फेरफटका मारल्यानंतर एक तासाने पुन्हा घाटावर आले असता, स्वच्छता केलेल्या ठिकाणी नागरिकांनी निर्माल्य टाकल्याचे दिसून आले. यामुळे लोकांमधील मानसिकतेत बदल होण्याबरोबरच त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करण्याची गरज असून, महापालिकेने त्यासाठी उपक्रम हाती घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.