आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Corruption News In Marathi, Hotels Are Using Domestic Gas Cylinders,Divya Marathi

हॉटेलवाल्यांच्या अहोरात्र सेवेत घरगुती गॅस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरगुती गॅसचा वापर हॉटेल व्यवसाय, चहा आणि वडापावच्या गाड्यांसाठी सर्रासपणे होत आहे. याला पुरवठा विभाग व गॅस एजन्सीचाच छुपा पाठिंबा मिळत आहे. यामुळे सामान्यांना गॅस सिलिंडर मिळो न मिळो. मात्र, घरगुती वापराचा गॅस व्यावसायिकांना तत्काळ उपलब्ध होतो. यातूनच शहरात एकीकडे घरगुती गॅससाठी सामान्य ग्राहकांना तासन्तास ताटकळत उभे रहावे लागत आहे.
अन्न-धान्य, पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक पुरता जेरीस आला आहे. गृहिणींचे किचनमधील बजेटही महागाईमुळे कोलमडले आहे. भारत पेट्रोलियम, इंडेन, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच व्यावसायिक गॅसच्या किमतीत वाढ केली आहे. डिसेंबरपर्यंत व्यावसायिक गॅसचा दर एक हजार 810 रुपये इतर होता, 1 जानेवारीपासून या गॅसचा दर 2 हजार 194 रुपये झाला आहे. गॅसच्या दरात तब्बल 384 रुपयांनी वाढ झाल्याने महामार्गालगत असलेले, तसेच शहरातील सावेडी, केडगाव, भिंगार, बोल्हेगाव या भागातील चहा व वडापाव गाडीवाले, छोटे हॉटेल व्यावसायिक घरगुती गॅसचा वापर हॉटेल व्यवसायासाठी करत आहेत. पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे गॅस एजन्सीमधील काही कर्मचारी या हॉटेल व्यावसायिकांना घरगुती गॅसचा पुरवठा करतात. व्यावसायिक गॅस 2 हजार 194 रुपयांनी मिळतो.
घरगुती गॅसची मूळ किंमत 450 रुपये आहे. मात्र, काळयाबाजारात घरगुती गॅस एक हजार ते बाराशे रुपयांनी मिळतो. एका गॅस सिलिंडरमागे 700 ते 800 रुपये वाचतात म्हणून छोटे हॉटेल व्यावसायिक घरगुती गॅस काळाबाजारातून घेतात.
व्यावसायिक गॅसच्या किमतीत वाढ झाल्याने हॉटेलचालक काळ्या बाजारातून एक हजार ते बाराशे रुपये दराने घरगुती गॅस सिलिंडर घेऊन त्याचा सर्रासपणे हॉटेलसाठी वापर करत आहेत. पुरवठा विभाग व गॅस एजन्सीच्या छुप्या पाठिंब्यातूनच गॅसचा काळाबाजार होत आहे. एकीकडे शहरात घरगुती गॅसचा हॉटेलसाठी वापर केला जात असताना दुसरीकडे मात्र पाइपलाइन रस्त्यावरील युनिटेक गॅस एजन्सीच्या ग्राहकांना गॅस सिलिंडरसाठी सकाळपासून रांगा लावाव्या लागतात.