Home »Maharashtra »North Maharashtra »Nashik» Cotrimoksazole Gentamicin To Dangerous To Child

अक्षम्य दुर्लक्ष: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ

प्रतिनिधी | Mar 25, 2012, 02:17 AM IST

  • अक्षम्य दुर्लक्ष: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ

नाशिक: देशात नवजात बालकांना कोट्रामॅक्सॉल आणि जेंटामायसिन या असुरक्षित औषधांचा डोस दिला जात आहे. ही औषधे बाळाच्या किडनी आणि मेंदूवर दुष्परिणाम करू शकतात. विशेष म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनमधल्या ‘आशा’ कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणात आशा मोड्युल क्रमांक 7 मध्ये इंग्रजी, हिंदी आणि मराठी पाठय़पुस्तकांच्या प्रतीतदेखील या औषधांचा नवजात अर्भकांसाठी वापर करावा, असे स्पष्ट उल्लेख आढळतात. या औषधांचा वापराने होणारे दुष्परिणाम आणि औषधांचा वापर करण्याचा सल्ला देणारी पुस्तके ताबडतोब रद्दबातल करावीत, या मागणीचे निवेदन खुद्द राष्ट्रीय आशा मार्गदर्शन समितीचे सदस्य डॉ. श्याम अष्टेकर यांनीच केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्यासह सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांना पाठवले आहे. मात्र, सरकारकडून अद्याप याची दखल घेण्यात आलेली नाही.
दोन महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळास ‘कोट्रिम’ औषध देऊ नये, असे बहुतेक आरोग्य ग्रंथांत नमूद करण्यात आले आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या एका पुस्तकात दोन महिन्यांखालील बाळासही ही औषधे देता येण्याचा उल्लेख होता. त्यामुळे काही प्रकाशनांनी पण असा उल्लेख केलेला आढळतो. याबाबत असलेले उलट सुलट प्रवाह पाहून महाराष्ट्र सरकारने मागील वर्षी यासाठी नेमलेल्या खास तज्ज्ञांच्या समितीने ही दोन्ही औषधे ‘आशा’ प्रशिक्षणात वापरू नयेत, असा स्पष्ट अहवाल दिलेला आहे.
काय म्हणतो अहवाल ?
कोट्रिममुळे बाळांमध्ये काविळीची शक्यता वाढते व त्यामुळे मेंदूवर कायमचे दुष्परिणाम होऊ शकतात. जेंटामायसिन इंजेक्शनबाबतीत किंचित जरी डोस जास्त झाला तर मूत्रपिंड आणि कानावर दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणूनच जेंटामायसिन हे औषध आशा किंवा परिचारिकांनी वापरण्याचे औषध नाही. जेंटामायसिन वापरायचेच, तर ते सुसज्ज रुग्णालयात योग्य ती देखरेख ठेवून आणि इतर प्रतिजैविकांसोबतच वापरावे, असा अहवाल महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने दिला आहे. या समितीत मुंबईमधील बालरोगतज्ज्ञ व औषधतज्ज्ञांचा समावेश होता. मात्र, अर्भकांमध्ये अशा औषधांच्या ट्रायल घेणे हेच मुळी वैद्यकीय नीतिमत्तेत बसत नाही.
‘आशा’ची सरकारकडूनच कोंडी
2005 पासून ‘आशा’ कार्यक्रम सुरू झाला. देशात नऊ लाख, तर राज्यात 60 हजार स्वयंसेविका कार्यरत असून त्यांच्यामुळे आरोग्य केंद्रांपर्यंत रुग्णांना पोहोचवण्याची टक्केवारीही वाढली आहे. असे असले तरी ‘आशा ’कार्यक्रमाची कोंडी केली जात आहे. स्वयंसेविकांना धड प्रशिक्षण नाही, औषधांचा पुरवठा वेळेवर नाही, मोबदलाही अपुरा आहे. मान्यताप्राप्त अभ्यासक्रम नसल्याने आशांचे स्थान डळमळीत होते आहे. स्वर्गीय राजनारायण यांच्या काळात सुरू झालेली आरोग्यरक्षक योजना गुंडाळल्याने लाखो कार्यकर्त्यांचे हाल झाल्याचा इतिहासच आहे. या आशा योजनेचीही पुरेशी काळजी घेतली गेली नाही तर या योजनेचेही तेच होण्याची दाट शक्यता आहे.
‘आशा’ कार्यकर्तींसाठी याचा उल्लेख अयोग्य
साध्या-मध्यम आजारांवर प्राथमिक उपचार करणे, आरोग्य शिक्षण आणि गंभीर आजार वेळीच ओळखून आरोग्य केंद्राकडे घेऊन जाणे हेच आशांचे काम आहे. गंभीर आजारांची जबाबदारी डॉक्टर आणि नर्स वगैरे पूर्णवेळ सेवकांवर असायला हवी. आशांसारख्या स्वयंसेविकांवर ही जबाबदारी ढकलणे योग्य नाही.

Next Article

Recommended