आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- ज्या इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्षं सत्ता गाजवली त्या ब्रिटिश सैन्यदलात लेफ्टनंट कर्नल असलेली आणि इराक, अफगाणिस्तानात युद्धप्रसंगी 'फ्रंटलाइन'वर काम केलेली मंगला सध्या लंडनहून 30 जणांचे 'वर्हाड' घेऊन थेट नाशकात दाखल झाली आहे, ती आपल्या स्वत:च्या मंगलकार्यासाठी! ऋणानुबंधाच्या गाठी बांधण्याचा हा पारंपरिक आणि अस्सल मराठमोळा सोहळा अनुभवताना ऑक्सफर्डला चार्टर्ड फायनान्शिअल अँनालिस्ट असलेला वर अलेक्झांडर मीड, त्याचे कुटुंबीय आणि ऑस्ट्रेलिया, र्जमनी, अमेरिका, कॅनडाहून आलेले उभयतांचे आप्त हरखून गेले आहेत.
मंगला व अलेक यांची ओळख झाली इंटरनेटच्या माध्यमातून. मग कॉफी, लंच, डिनर अशी मैत्री बहरत गेली अन् ऑस्ट्रेलिया टूरवर अलेकने तिला 'प्रपोज' केले. अपेक्षेनुसार मंगलाने होकार दिला. पण, मुख्य लग्नसोहळा भारतातल्या आपल्या गावी, नाशकात होईल अशी लडिवाळ अटही घातली. भारतीय पारंपरिक लग्नसोहळ्यांची 'क्रेझ' पाश्चिमात्यांतही असल्याने अलेकने तात्काळ होकार दिला. त्यानुसार, उद्या (ता. 21) गोरज मुहूर्तावर येथे दोघे विवाह बंधनात अडकत आहेत. अस्सल भारतीय पोषाखातल्या मंगलाला पाहून ही सैन्यदलात वगैरे असेल असे वाटणारसुद्धा नाही. पण, बारा वर्षांपासून ती इंग्लंडच्या सैन्यदलात निरनिराळ्या जबाबदार्या पार पाडत आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमानंतर सन 2000 मध्ये ती रेजिमेंटल मेडिकल ऑफिसर म्हणून तेथील सैन्यदलात दाखल झाली.
2003 आणि 2006 मध्ये इराकच्या आघाडीवर, तर 2009 मध्ये अफगाणिस्तानच्या आघाडीवर तिने मोर्चा सांभाळला. दरम्यान, मेजर पदावर पोहचेपर्यंत दोन वेळा ती अगदी 'फ्रंटलाइन'वरदेखील होती. पंधरवड्यापूर्वीच तिला लेफ्टनंट कर्नल म्हणून बढती मिळाली असून, विवाहाच्या पार्श्वभूमीवर जणू हा दुग्धशर्करा योगच जुळून आला आहे.
भारतीय संस्कारांमुळेच इथे सोहळा : जन्मापासून इंग्लंडमध्येच वाढले असले तरी भारतीय संस्कार रुजल्यामुळे इथे आल्यावर अजिबात परके वाटत नाही. त्यामुळे लग्न सोहळा इथेच करायचा हे निश्चित होते. आता तो क्षण प्रत्यक्षात येत असल्याची अनुभूती अवर्णनीय असल्याचे मंगलाने 'दिव्य मराठी'ला अस्खलित मराठीमध्ये सांगितले, तर भारतीय पद्धतीने लग्न करताना खूप छान वाटत असून, हा अनुभव सदैव स्मरणात राहणार असल्याची भावना अलेक यांनी व्यक्त केली. या निमित्ताने आपले आई-वडील आणि बहीण प्रथमच भारतात आले. मात्र, आता आम्ही कायम येत राहू, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. मंगला आणि अलेक दोघांनाही खेळांची आवड आहे. दोघेही स्किइंग उत्तम करतात. मंगलाने लंडन आणि बर्लिन या दोन्ही प्रसिद्ध मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केल्या असून, अलेकदेखील पावणेचार किलोमीटर पोहणे, त्यानंतर 180 किलोमीटरची मोटारसायकल सफर आणि पाठोपाठ 42 किलोमीटरची मॅरेथॉन अशा 'अँडव्हेंचर'मध्ये तरबेज आहे.
वैदिक पद्धतीने विवाह : लक्ष्मणराव देशपांडेकृत 'वर्हाड निघालंय लंडनला' या अजरामर कलाकृतीतल्या लगबगीप्रमाणेच इंग्लंडहून नाशकात आलेल्या या वर्हाडाचीही लग्नघरी लगबग सुरू आहे. पाहुण्यांचे ओवाळून, कुंकुमतिलक लावून स्वागत झाले. हळद, मेंदी, मंगलाष्टके हे सगळे अगदी रितीरिवाजानुसार होणार असून, विवाहप्रसंगी मंगला नऊवारी शालू तर अलेक शेरवानी कुर्ता, फेटा असा अस्सल मराठमोळा साज चढवणार आहेत. खाण्याच्या पदार्थांची चंगळ असली तरी हे सगळे पदार्थ शाकाहारीच असतील. अल्कोहोल आणि नॉनव्हेज मेन्यूतून जाणीवपूर्वक हटविण्यात आल्याचे मंगलाचे काका सुधाकर पाटील यांनी सांगितले. मुख्य विवाह सोहळा भारतीय रितीरिवाजानुसार वैदिक पद्धतीने होणार असून, 'ऑक्सफर्ड'मध्ये ज्या ठिकाणी विन्स्टन चर्चिल यांचा जन्म झाला त्या 'बेनहम पॅलेस'मध्ये 30 तारखेला पुन्हा तिकडच्या पद्धतीनुसार सोपस्कार होतील, अशी माहिती मंगलाचे वडील लीलाधर पाटील व आई शालिनी पाटील यांनी दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.