आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्‍ये अपत्यप्राप्तीसाठी महिन्याकाठी 200 दांपत्ये वीर्य बँकेच्या वाटेवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- दांपत्यांमध्ये वाढत चाललेल्या वंध्यत्वावर मात करून त्यांच्या आयुष्यात अपत्यप्राप्तीचा अंकुर फुलविण्यासाठी वीर्यदानाचा उपचार सर्वसामान्य जोडप्यांसाठी फलदायी ठरत आहे. अन्य उपचारांच्या तुलनेत हा उपचार अधिक प्रभावी व तुलनेने सोपा असल्याने, वीर्य बँकेच्या माध्यमातून महिन्याकाठी 200 दांपत्ये इन्ट्रा-युटॅरियन इन्सेमिनेशन (आययूआय) उपचार घेत आहेत.

जोडीदाराच्या शारीरिक अथवा मानसिक कारणामुळे महिलेला इच्छा असूनही अपत्यप्राप्ती होत नसेल तर अशावेळी एआयडी (आर्टिफिशियल इन्सेमिनेशन विथ डोनर स्पर्म) अर्थात रुग्णालयातून कृत्रिम पद्धतीने वीर्य स्वीकारून अपत्यप्राप्तीचा पर्याय अवलंबिला जातो. ही पद्धती म्हणजे चिकित्साशास्त्राचीच एक शाखा आहे. ज्यामध्ये गर्भधारणेपासून ते बाळंतपणापर्यंतचा विशेष अभ्यास केला जातो. बहुतांश दांपत्यांमध्ये पुरुषांतील वंध्यत्व हे मुख्य कारण असते अशा वेळी त्या दांपत्यापुढे दत्तक मूल घेणे अथवा वैद्यकीय उपचारांच्या माध्यमातून अपत्यप्राप्ती असे दोन पर्याय असतात. काही दांपत्यांच्यादृष्टीने वैद्यकीय उपचारांतील टेस्ट ट्यूब बेबी उपचारपद्धती महागडी असल्याने, त्यांच्यापुढे वीर्य बँकेच्या माध्यमातून माफक दरांत अपत्यप्राप्तीचा पर्याय असतो.

अशी होते दात्याची निवड
ज्या दात्याकडून वीर्य संकलित करण्यात आले, त्याची नोंद वीर्य बँकेत घेतलेली असते. त्यात रंग, उंची, शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी, वैद्यकीय इतिहास, आनुवंशिक आजार असल्यास त्याचीही नोंद असते. यात शारीरिक वैशिष्ट्ये व रक्तगटाचीही नोंद ठेवली जाते. त्यानंतर व्हीआरएल व हिपॅटायटीस-बी तपासणीही होते.विशेषत: दाता व दांपत्याला एकमेकांना माहिती होणार नाही, याची गोपनीयता पाळली जाते. ही सर्व नोंद सांकेतिक भाषेत संगणकात सुरक्षित केली जाते.

वीर्यदानाची पद्धत
आवश्यक ती माहिती व तपासणीनंतर दात्याकडून निर्जंतुक पात्रात वीर्य संकलित केले जाते. विविध तपासण्या केल्यानंतर 0.5 अंश सेल्सिअस तपमानात वीर्य गोठविले जाते.

उपचाराकडे कल वाढला
आययूआय उपचार घेण्याकडे दांपत्यांचा कल वाढला आहे. हे उपचार अत्यंत गोपनीय व कायदेशीर बाबी तपासूनच केले जातात. महिन्याकाठी सुमारे 200 दांपत्ये येतात. अन्य उपचारपद्धतींच्या तुलनेत ही उपचार पद्धती आर्थिकदृष्ट्या परवडणारी आहे. - डॉ. यशवंत माने, वंध्यत्व निवारणतज्ज्ञ

अशी आहे उपचारपद्धती
वीर्य स्वीकारण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. या उपचारांत प्रयोगशाळेत स्वच्छ केलेले निरोगी शुक्राणू एका नळीद्वारे गर्भाशयात सोडले जातात. परदेशात प्रचलित असलेली ही उपचार पद्धती भारतातही स्वीकारली जाऊ लागली आहे.

उपचारामागील कारणे

  • शुक्राणूंची अल्प संख्या अथवा शुक्राणू सक्षम नसणे
  • पुरुषातील अन्य शारीरिक अथवा मानसिक कारण
  • महिलेच्या गर्भाशयमुख किंवा त्यासंदर्भातील दोष