नाशिक- परदेशात ट्रेडिंग करून रक्कम दुप्पट करण्याचे अामिष दाखवून काेट्यवधीचा गंडा घालणाऱ्या प्रदीप वाघला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले अाहेत. रविवारी गुन्हे शाखेच्या पथकाने घोडबंदर येथे वाघच्या मुसक्या आवळल्या होत्या. सोमवारी न्यायालयात हजर केले होते.
परदेशात बनावट कंपन्या स्थापन करून शहरातील नामवंत व्यावसायिकांना कोट्यवधीचा गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात हुकूमत वालेच्या यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित वाघ फरार झाला होता. सरकारी वकील राजेंद्र घुमरे आणि अॅड. राहुल पाटील यांनी संशयितांचे पासपोर्ट जप्त करण्याची मागणी न्यायालयाने मान्य केल्याने संशयित परदेशात फरार झाला नाही. मात्र, मुंबईमध्ये तो विविध ठिकाणे बदलून राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अखेर घोडबंदर येथे संशयित वाघला अटक करण्यात आली. सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. संशयिताने अपहार केलेली रकमेची कुठे विल्हेवाट लावली, परदेशात असलेल्या कंपन्यांचे बनावट स्टॅम्प, इ-मेल अादी बाबींची चौकशी करण्यासाठी तपासी पथकाने पोलिस कोठडीची मागणी केली होती.