आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Court Seize Order Of Nashik Mayor Chair And Furniture

नाशिक महापौरांची ‘वाचली खुर्ची’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महापालिका आयुक्त व महापौरांच्या आसनांसह त्यांच्या कार्यालयातील सर्व टेबल-खुर्च्‍या जप्तीचे वॉरंट सोमवारी अचानक येऊन धडकल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. पालिकेच्या कारभार्‍यांसह अधिकार्‍यांनी केलेली याचिकाकर्त्याची मनधरणी व न्यायालयात केलेला रीतसर अर्ज यामुळे हे बालंट तूर्त टळले. न्यायालयाने जप्ती आदेशास 24 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे.

सातपूर विभागात त्र्यंबकरोडवर गट नं. 525 मध्ये राजेश मोहनलाल राय यांचे शिवम नावाचे सिनेमागृह आहे. तेथून शहर विकास आराखड्यातील 15 मीटरचा रस्ता जात असून, 20 ते 25 वर्षांपासून तो दुर्लक्षित आहे. आयुक्तांना वारंवार निवेदन देऊनही रस्ता होत नसल्याने आठ-दहा वर्षांपासून सिनेमागृह बंद करावे लागून मोठे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच संबंधित जागेवर अतिक्रमण झाल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली होती.

जिल्हा न्यायालयात दावाही दाखल केला होता. त्याच्या विरोधात महापालिकेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, निकाल राय यांच्या बाजूने लागल्यानंतर हा दावा पुन्हा जिल्हा न्यायालयाच्या सहदिवाणी न्यायालयात (वरिष्ठ स्तर) वर्ग झाला होता. वर्षभरापासून त्याची सुनावणी सुरू होती. न्या. उल्का जोशी यांनी महापालिका हुकूमनाम्याची अंमलबजावणी करत नसल्याने व त्याचा भंग करत असल्याने आठ दिवसांपूर्वी महापालिकेच्या जंगम मालमत्तेची जप्ती करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी दुपारी न्यायालयाचे बेलिफ जे. पी. दवंडे, शहाजी सावंत यांच्यासह तक्रारकर्ते राय आयुक्त कार्यालयात आले व आयुक्तांचे स्वीय सहायक कैलास दराडे यांना जप्तीचे वॉरंट दाखवले. आयुक्त संजय खंदारे कार्यालयात नसल्याने दराडे यांनी उपायुक्त आर. एम. बहिरम व हरिभाऊ फडोळ यांच्याशी संपर्क साधला. अधिकार्‍यांनी बेलिफ व राय यांची मनधरणी सुरू केली. तसेच, न्यायालयाकडे डी.पी.रोडच्या कामासह अतिक्रमण हटवण्यासाठी वेळ आणि नियोजन करण्याकरता अर्ज केल्याची माहितीही दिली. मात्र, राय यांनी रस्त्याचे काम दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे लेखी देण्याची मागणी केली.

महापौरांचा ‘युक्तिवाद’ यशस्वी
महापालिकेच्या अधिकार्‍यांबरोबर झालेल्या चर्चेतून मार्ग न निघाल्याने व्यवसायाने वकील असलेले महापौर यतिन वाघ यांनी ‘युक्तिवाद’ करून संकट तात्पुरते टाळले. बेलिफ व राय यांना दोन दिवसात या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.


काय होते वॉरंटमध्ये..
न्यायालयाने काढलेल्या या जप्तीच्या वॉरंटमध्ये आयुक्त व महापौरांच्या कार्यालयातील खुच्र्यांसह त्यांच्या कार्यालयातील सर्व टेबल-खुच्र्या जप्त करून त्याबाबतची माहिती 24 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.

बेलिफाची राय यांच्याकडून शोधाशोध
अधिकार्‍यांशी बोलणी झाल्यानंतर बाहेर आलेले बेलिफ दवंडे बराच वेळ न दिसल्याने याचिकाकर्ते राय चिंतातुर झाले. 15-20 मिनिटांनंतर बेलिफ दिसल्याने राय यांच्या चेहर्‍यावर हसू फुटले.


उपायुक्त-राय यांच्यात रंगला कलगीतुरा
महापालिका उपायुक्त फडोळ व याचिकाकर्ते राय यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. ‘खुर्ची घेऊन तुमचे काम होणार आहे का, तुम्हाला काम करून हवे की खुर्ची पाहिजे’, असे फडोळ यांनी विचारले. काही अधिकार्‍यांनी संबंधित जागेवरून ‘निळी रेषा’ जात असल्याने पाहणी करावी लागेल, असे सांगताच राय यांनीही प्रत्युत्तर दिले.