आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशाच्या वादातून चुलत बहिणीवर प्राणघातक हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पैशांच्या वादातून चुलत भावानेच घरात घुसून बहिणीसह तिच्या जाऊवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी सिडकोत घडली. या हल्ल्यात दोघीही महिला गंभीररीत्या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयित हल्लेखोराला अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सिडकोतील शिवाजी चौकात राहणार्‍या मेघा राजेश नवलाख (28) व शेजारीच राहणारी जाऊ ऋतुजा रूपेश नवलाख (32) या दुपारी घरी होत्या. त्याचवेळी मेघाचा चुलत भाऊ नितीन सुभाष पवार (रा. पवननगर) हा दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास बहिणीच्या घरी आला. मेघाचा पती राजेश (दाजी) यांच्याकडे गुंतवणुकीसाठी दिलेल्या पैशांची विचारणा करू लागला. बहिणीने त्याची समजूत काढून ते आल्यावर बोलू, असे सांगत असतानाच संतापलेल्या नितीन आणि बहिणीत पैशांवरून कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाचे पर्यवसान हाणामारीत होताच बहिणीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली, तोच शेजारील तिची जाऊ ऋतुजा नवलाख हिने घरात प्रवेश करीत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. तोच नितीन याने स्वयंपाक खोलीत समोरच पडलेला चाकू उचलून मेघाच्या गळ्यावर व शरीरावर वार केले. एवढय़ावरच न थांबता नितीन याने तिची जाऊ ऋतुजा हिच्या पोटात चाकूने वार केले. या दोघा जावांचा आक्रोश ऐकताच रहिवाशांनी धाव घेतली. तोच रक्ताचे हात माखलेला संशयित नितीन हा पळून जात असताना त्यास लोकांनी पकडले. रहिवाशांनी त्यास बेदम चोप दिल्याने तो किरकोळ जखमी झाला.

घटनेचे वृत्त अंबड पोलिसांना समजातच वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्यातील गंभीर जखमी झालेल्या दोघी जावांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघींची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी, सहायक आयुक्त हेमराजसिंह राजपूत, अंबडचे निरीक्षक शांताराम अवसरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली.

दोघा जावांची मृत्यूशी झुंज
चुलत भावानेच केलेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या मेघा व ऋतुजा यांच्यावर सिडकोतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील एकीची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू होती. पैशांच्या वादातून झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाल्याने नागरिकांनी शिवाजी चौकात गर्दी केली होती.