आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिगत वीजतारेचा प्रवाह रस्त्यात उतरून गाईचा मृत्यू, ठेकेदार-प्रशासनावर कारवाईची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको- पवननगर येथे गुरुवारी (दि. १३) भूमिगत तारांमुळे थेट रस्त्यात वीज प्रवाह उतरल्याने एका गाईला प्राणास मुकावे लागले, तर दाेन नागरिकांना धक्का बसला. शहरात उघड्या विद्युत तारा भूमिगत करण्याची मागणी हाेत असताना काेट्यवधींची कंत्राटे देऊन झालेली ही कामे कोणत्या दर्जाची कशा पद्धतीने झाली अाहेत, याचा अनुभवच सिडकोवासीयांना या प्रकारामुळे अाला. रस्ता तयार करताना भूमिगत तार खराब हाेऊन ही दुर्घटना झाल्याचे कारण महावितरणच्या वतीने देण्यात अाले. दरम्यान, ठेकेदार प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली असून, संबंधितांवर कारवाई करावी; अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात अाला आहे.
 
गुरुवारी सकाळी पवननगर पोलिस चौकीच्या मागील बाजूस नागरिकांच्या रहदारीच्या रस्त्यावर अचानक वीज प्रवाह उतरला. पाऊस पडत असल्याने वीज प्रवाहाचा झटका काही नागरिकांना जाणवला. त्याच वेळी तेथून जाणाऱ्या एका गायीलाही झटका बसून तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर नागरिकांनी विद्युत विभागाला कळविले; मात्र नागरिकांच्या सेवेसाठी असलेल्या संपर्क क्रमांकावर फोन उचलला जात नव्हता. अर्धा ते एक तास नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत हाेते. अाणखी अनर्थ घडू नये, यासाठी त्या भागातील वीजप्रवाह त्वरित खंडित करणे गरजेचे हाेते. काही नागरिकांनी नगरसेवक श्यामकुमार साबळे यांना कळविले असता त्यांनी घटनास्थळी दाखल होत विद्युत विभागाशी संपर्क साधून वीज प्रवाह खंडित करावयास लावला. यानंतर मृत गाईवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पूजा करताना सरला चौरे या महिलेलाही विद्युत प्रवाहाचा झटका बसला. त्यांच्या हातातील आरतीचे ताट खाली पडले. नगरसेवक साबळे जागृत नागरिकांनी तत्काळ दक्षता घेत त्यांचे प्राण वाचविले. या सर्व प्रकाराने परिसरातील नागरिक प्रचंड घाबरले होते. एवढी गंभीर घटना घडूनही महापालिकेच्या एकाही अधिकाऱ्याला घटनास्थळी भेट देण्याची अावश्यकता वाटली नाही. दादा कापडणीस, दिनेश खैरनार, शरद शेलार, अमोल सदावर्ते, राधाकृष्ण आहेर, प्रभाकर पाटील, उमेश पाटील आदी नागरिकांनी या सर्व प्रकाराबाबत संबंधित अधिकारी ठेकेदारांवर कारवाईची मागणी केली आहे.
 
वीजतारांची भीती अाधी अन‌् अाताही...
सिडकोतअनेक ठिकाणी विद्युत तारा उघड्यावर आहेत. या विद्युत तारा भूमिगत केल्याने धोका टळतो, असे नागरिकांना वाटत असताना भूमिगत विद्युत तारा किंवा वायरही सुरक्षित नसल्याचे या प्रकारातून समोर आले आहे. त्यामुळे अगोदरच उघड्या विद्युत तारांची भीती असताना भूमिगत तारांबाबतही भीतीचे वातावरण पसरले आहे.
 
या रस्त्याने जातात शाळकरी मुले...
रस्त्यावर वीजप्रवाह उतरल्याचे काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी इतरांना सावध केले. या रस्त्यावरून शाळेची मुले जातात. येण्याजाण्याचा हा मुख्य रस्ता आहे. नागरिकांच्या वेळीच लक्षात आले नसते तर येथून जाणाऱ्या अनेकांच्या जीवावर बेतू शकले असते. एकाला वाचवायला गेलेल्या दुसऱ्याच्या जीवावर बेतून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता हाेती.
 
बातम्या आणखी आहेत...