आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हंबरून वासराले चाटती त्याची माय..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वेळ मध्यरात्रीची... स्थळ गंगापूररोडवरील डॉ. वसंत पवार चौक... सुनसान रस्त्यावर एक गाय सैरावैरा धावत जोरजोरात हंबरू लागली... रात्रीच्या शांततेला चिरणारे हे हंबरणे ऐकून काही तरी अघटित झाल्याच्या विचाराने लोक घराबाहेर पडतात अन् काही वेळातच गाय नक्की का हंबरतेय, याचा शोध सुरू होतो. या हंबरड्याला एका चेंबरमधून प्रतिसाद मिळतो... तिच्या वासराचा. महापालिकेच्या अक्षम्य चुकीमुळे या मुक्या प्राण्याचा जीव धोक्यात आल्याचे सर्वांच्याच लक्षात येते. अग्निशमन दलाच्या जवानांनाही पाचारण केले जाते. तब्बल दीड तासाच्या प्रयत्नांनंतर वासराला चेंबरमधून सुखरूप बाहेर काढले जाते अन् सर्वांचाच जीव भांड्यात पडतो.

होरायझन शाळा परिसरात रविवारी एक गाय सायंकाळपासून सैरावैरा फिरत असल्याचे नागरिकांना दिसली. मात्र, ती का फिरत आहे, हे न उमजल्याने लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. रात्री 11.30 वाजेच्या सुमारास संतोष कुलकर्णी, किरण चव्हाण व गणेश पाटील हे तिघे मित्र या परिसरातून जात असताना त्यांना ती दिसली. काही वेळातच गायीचे हंबरणे वाढले. विशेष म्हणजे, या हंबरण्याला चेंबरमधून प्रतिसाद मिळाला. तेथूनही हंबरण्याचा आवाज ऐकू आल्यावर या तिघांनी तातडीने परिसरातील सामाजिक कार्यकर्ते किशोर शिरसाठ यांना पाचारण केले.
त्यांनी परिसरातील सर्वच चेंबर्सचा कानोसा घेतला तर प्रत्येक चेंबरमधून हंबरण्याचा आवाज येत होता. त्याचवेळी प्राणीमित्र दीपक शिंदे तेथे पोहोचले व त्यांनी आपला जीव धोक्यात घालून चेंबरमध्ये उतरणे पसंत केले. चेंबरमध्ये एका कोपर्‍यात वासरू बसले असल्याचे त्यांच्या लक्षात येताच आजूबाजूच्या सर्व चेंबर्सचे ढापे उघडण्यात आले, जेणेकरून वासराला गॅसचा त्रास होणार नाही आणि श्वासही व्यवस्थित घेता येईल. दुसरीकडे तातडीने अग्निशमन विभागाशी संपर्क साधण्यात आला. अग्निशमन दलाचे कर्मचारी संतोष आगलावे, राजेंद्र नाईक, सुनील पाटील, संजय कांदे, अशोक सरोदे, आर. डी. सोनवणे यांनी परिस्थितीचे अवलोकन करून चेंबरमध्ये एका कर्मचार्‍याला उतरविण्याचा निर्णय घेतला. या कर्मचार्‍यासोबत दीपक शिंदेही उतरले. त्यांनी वासराचे पाय दोरीने बांधले व बाहेरील कर्मचार्‍यांनी दोरी ओढली. बराच वेळ पाण्यात बसलेले हे वासरू थंडीने कुडकुडत होते. परंतु, गाय दिसताच ते तिच्याकडे धावले. या वेळी गायीने त्याला चाटत आपल्या मायेचा आधार दिला व काही वेळातच ती वासराला घेऊन निघून गेली.
प्रशासनाला जाग केव्हा येणार ?
पावसाच्या पाण्यामुळे शहरात ठिकठिकाणी चेंबरचे ढापे उघडण्यात आले आहेत. पाऊस ओसरला तरी हे ढापे मात्र चेंबरवर ठेवण्यात आले नाही. त्यामुळे लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो, याचे सोयरसुतकही महापालिका प्रशासनाला नाही. गंगापूररोडला ज्या चेंबरमध्ये वासरू पडले होते, त्याच्यावर सोमवारी सायंकाळपर्यंत ढापा ठेवण्यात आला नव्हता. महापालिका प्रशासन त्यात आणखी प्राणी किंवा व्यक्ती पडण्याची वाट बघत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ढाप्यांची तपासणी व्हावी
वासराला चेंबरमधून सहीसलामत वाचविणे हेच आमचे सर्वांचे ध्येय होते व त्यात आम्हाला यश लाभल्याचे समाधान वाटते. महापालिकेने आता तरी आपला कारभार सुधारावा. प्रत्येक ठिकाणच्या चेंबरवर ढापे आहेत की नाहीत, याची नियमित तपासणी व्हावी.
- दीपक शिंदे, प्राणीमित्र