आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन पाेलिस ठाण्यांना प्रत्येकी ५० कर्मचारी, म्हसरूळ मुंबई नाका ठाणे दोन दिवसांत कार्यान्वित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयात मुंबई नाका आणि म्हसरूळ या दोन नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. बुधवारी रात्री उशिरा गृहमंत्रालयाकडून पोलिस आयुक्तांना याबाबतचे आदेश प्राप्त झाले. त्याप्रमाणे मुंबई नाका आणि म्हसरूळ पोलिस ठाण्यांच्या हद्दी कायम करण्यात आल्या अाहेत. नवीन पोलिस ठाण्यांची सुभेदारी कोणास मिळते, याबाबत उत्सुकता लागून आहे. नवीन पोलिस ठाण्यांसाठी प्रत्येकी ५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पंचवटी, आडगाव या दोन ठाण्यांचे विभाजन करण्यात येऊन म्हसरूळ पोलिस ठाणे निर्माण करण्यात आले. तर सरकारवाडा, भद्रकाली, इंदिरानगर, उपनगर आणि अंबड या पोलिस ठाण्यांतील परिसर वगळण्यात येऊन मुंबई नाका हे पोलिस ठाणे निर्माण करण्यात आले आहे. भौगोलिकदृष्ट्या पंचवटी पोलिस ठाण्याची हद्द सर्वात मोठी आहे. पंचवटी पोलिस ठाण्याचा सर्वाधिक परिसर म्हसरूळ पोलिस ठाण्यात समाविष्ट केला आहे. आडगाव पोलिस ठाण्यातील म्हसरूळ शिवाराचा भागही म्हसरूळ पोलिस ठाण्यात समाविष्ट करण्यात आल्याने आडगाव पोलिस ठाण्याची हद्द कमी झाली आहे. भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बहुतांशी झोपडपट्टीबहुल परिसर, अंबड पोलिस ठाण्यातील गोविंदनगर परिसर, सरकारवाडा पोलिस ठाण्याचा गोल्फ क्लब, महामार्ग, तर उपनगर पोलिस ठाण्याचा दीपालीनगर परिसर आणि उपनगर पोलिस ठाण्याचा अशोकामार्ग परिसराचा मुंबई नाका पोलिस ठाण्यात समावेश करण्यात आला आहे. पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची नेमणूक प्रलंबित आहे. म्हसरूळ पोलिस ठाण्यासाठी म्हसरूळ पोलिस चौकीचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्याचा कार्यभार वाहतूक शाखेच्या कार्यालयात सुरू होईल.

शहर ग्रामीणचे मिश्रण
म्हसरूळ पोलिस ठाण्यात सर्वाधिक ग्रामीण परिसराचा समावेश आहे. तर, मुंबई नाका पोलिस ठाण्यात झोपडपट्टी आणि शहरी भागाचा समावेश करण्यात आला आहे.

याठाण्यांचा भार हलका
सरकारवाडा,भद्रकाली, इंदिरानगर आणि उपनगर पोलिस ठाण्यांचा सर्वाधिक परिसर समाविष्ट करण्यात अाल्याने पोलिस ठाण्यांचा भार हलका झाला अाहे.

यांचीहोऊ शकते नियुक्ती
म्हसरूळ पोलिस ठाण्याचा कारभार वरिष्ठ निरीक्षक नरेंद्र पिंगळे, तर मुंबई नाका पोलिस ठाण्याचा पदभार बाजीराव महाजन यांच्याकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे.