आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेटच्या हिरव्या मैदानांचे बनणार ‘राजकीय आखाडे’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पावसाळासंपताच क्रिकेटच्या मोसमास खऱ्या अर्थाने प्रारंभ होतो. मात्र, यंदा पावसाळा संपत असतानाच महानगरातील सर्व प्रमुख क्रिकेट मैदानांवर विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभा होणार असल्याने तीन महिने मेहनत घेऊन हिरव्यागार ठेवलेल्या खेळपट्ट्यांचे राजकीय कुस्त्यांचे आखाडे बनून मैदानांची सर्वार्थाने वाट लागण्याची भीती निर्माण झाली आहे.

क्रिकेट स्पर्धांना सुरुवात होण्यापूर्वीच राजकीय पक्षांकडून मैदानांच्या बुकिंगला प्रारंभ झाला आहे. कोणत्याही पक्षाची राजकीय सभा म्हणजे हौशा-नवशा कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. त्यामुळे मैदाने आणि सातत्यपूर्ण प्रयासाअंती हिरव्यागार बनवलेल्या खेळपट्टीची अवस्था सध्याच्या शहरातील रस्त्यांप्रमाणे खड्डामय बनण्याची भीती क्रिकेटप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. राजकीय सभांसाठी नाशिकमधील महत्त्वाचे आणि राजकीयदृष्ट्या निवडणुकीचा कल स्पष्ट करणारे मैदान म्हणजे गोल्फ क्लब अर्थात अनंत कान्हेरे मैदान. या मैदानावर सभा घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागलेली असते. त्यामुळे या मैदानावर प्रत्येक प्रमुख राजकीय पक्षाची किमान एक, याप्रमाणे चार-पाच मोठ्या नेत्यांच्या सभा होणार आहेत. प्रत्येक सभेप्रसंगी मैदानासह खेळपट्टीवरही संक्रांत येणार आहे. नाशिकरोडचे शिखरेवाडी मैदान, तसेच सिडकोच्या राजे संभाजी स्टेडियमवरही कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती राहणार आहे.

हुतात्मा अनंत कान्हेरे (गोल्फ क्लब) मैदानातील क्रिकेटच्या या हिरव्यागार खेळपट्टीची विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या राजकीय सभांनी पुरती वाट लागणार आहे.

खेळपट्टीसाठी लागतात किमान दोन महिने
कोणत्याहीकारणाने उखडली गेलेली क्रिकेटची खेळपट्टी पूर्ववत करण्यास किमान दोन महिन्यांचा कालावधी लागतो. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा शहरातील प्रमुख मैदानांची वाट लागणार असल्याने क्रिकेटपटूंना चांगल्या खेळपट्टीवरील सरावासाठी बहुधा नवीन वर्षाचीच वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.