आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- टिप्पर गँगचा म्होरक्या समीर नासीर पठाण याने शुक्रवारी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अंबडचे पोलिस उपनिरीक्षक महेश्वर गावित यांच्यावर हल्ला केला. समीरचे वडील नासीर पठाण यांनीही गावित यांना मारहाण केल्याने रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सरकारवाडा पोलिस ठाण्यात समीर व नासीर पठाण यांच्याविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
सिडकोत वाहन जाळपोळ, लूटमार, सोनसाखळी चोरी अशा गुन्ह्यांद्वारे दहशत पसरवण्यासह काही महिन्यांपूर्वीच्या एक कोटीच्या लुटीतही टिप्पर गँगचाच हात असल्याचे उघड झाले आहे. या गुंडांची दहशतीविरोधात मोक्काअंतर्गत पोलिसांनी कारवाई सुरू केली. त्यामुळेच संशयित समीर ऊर्फ छोटा पठाण याच्यासह सहा साथीदार मध्यवर्ती कारागृहात आहेत. समीर आजारी असल्याने दोन दिवसांपासून उपचार सुरू होते. शुक्रवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी उपनिरीक्षक गावित कर्मचार्यांसह रुग्णालयात आले. त्यावेळी नासीर पठाण मुलाला भेटण्यासाठी आला असताना त्याच्या मदतीने समीरने हातातील कडी तोडून पळण्याचा प्रयत्न केला. गावित यांनी विरोध करताच पिता-पुत्राने हल्ला केला. गावित यांच्या डोके व तोंडावर जबर जखमा झाल्या असून इतर कर्मचारी वेळीच धावून आल्याने पुढील अनर्थ टळला. गावित यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी
गावित यांच्यावरील हल्ल्याचे वृत्त समजताच पोलिस उपआयुक्त साहेबराव पाटील, सहायक आयुक्त गणेश शिंदे तसेच सरकारवाडा पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले. संशयितांना ताब्यात घेत त्यांनी गोंधळ नियंत्रणात आणला.
आता पोलिसही दहशतीखाली
टिप्पर गँगच्या मुसक्या आवळण्याचे धाडस पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या नेतृत्वाखाली यंत्रणेने केले. मात्र, या गुंडांना राजकीय आर्शय मिळत असल्यामुळे अनेक अडचणीही येत आहेत. त्यातच आता थेट पोलिस अधिकार्यावरच हल्ला झाल्याने सामान्य कर्मचारी दहशतीखाली वावरत असल्याचे दिसून येते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.