आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जे. डी. पवारांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; पाच कोटींच्या फसवणुकीचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. जे. डी. पवार यांच्यासह तिघा जणांविरुद्ध प्रत्यक्ष कर्जाची रक्कम वितरित न करता बनावट कर्जप्रकरणे करून सुमारे 4 कोटी 80 लाखांच्या कथित फसवणूकप्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वादग्रस्त घंटागाडी ठेकेदार रामराव पाटील यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. धक्कादायक बाब म्हणजे, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी थेट हस्तक्षेप केल्यानेच गुन्हा दाखल झाल्याचा आणि कर्ज घेऊन त्याची परतफेड न करता बँक बुडविण्याचा तक्रारदाराने प्रयत्न केल्याचा आरोप डॉ. पवार यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

जे. डी. पवारांसह तिघांविरुद्ध गुन्हा

रामराव पाटील यांनी पंचवटी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, डॉ. जे. डी. पवार, एकनाथ निकम आणि हेमंत पाटील यांनी आपल्यासह नातेवाइकांना कर्ज मंजुरीचे आश्वासन देऊन कोरे कागद व धनादेशांवर स्वाक्षरी घेऊन प्रत्यक्ष कर्ज वितरित केले नाही. याउलट, सुमारे 4 कोटी 80 लाखांची रक्कम परस्पर काढून घेत फसवणूक केली. यासंदर्भात विचारणा केली असता दमदाटी, शिवीगाळ केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. त्यानुसार, पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गृहमंत्र्यांचा पोलिस यंत्रणेवर दबाव
गिरणा बॅँकेचे डॉ. पवार व रामराव पाटील यांच्यात बॅँकेच्या कर्जप्रकरणावरून दोन वर्षांपासून वाद सुरू असून, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. शोरूम जप्तीच्या कारवाईनंतर रामराव पाटील यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी कॉँग्रेसचा शहर उपाध्यक्ष या नात्याने लेटरपॅडवर तक्रार केली. त्याच पत्रकावर गृहमंत्र्यांनी स्वत:च्या स्वाक्षरीने पोलिस आयुक्तांना तक्रार अर्जाची चौकशी करून अहवाल द्यावा, असा आदेश प्राप्त करून घेतला. पाटील यांनीच हे पत्र सादर केल्याने पोलिसांवर दबाव आल्याने त्यातूनच पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाही
रामराव पाटील यांनी गृहमंत्र्यांकडे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहर उपाध्यक्ष म्हणून लेटरपॅडवरील पत्र सादर केले असेल तर ते चुकीचे आहे. पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीचे उपाध्यक्षपद नसल्याने त्यांनी गृहमंत्र्यांची दिशाभूल केली. याबाबत चौकशी करून पक्षर्शेष्ठींना कळवू.
शरद कोशिरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस


कर्ज बुडविण्याच्या प्रयत्नातून खोटी तक्रार
रामराव पाटील यांनी गृहमंत्र्यांकडे खोटी माहिती देत चौकशीचे आदेश मिळविले. मुळात पाटील यांनी घंटागाडी व्यवसायासाठी कर्ज घेऊन ते न फेडता बढे पतसंस्थेप्रमाणे बॅँक बुडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांचे ट्रॅक्टर शोरूम जप्त झाले. याविरुद्ध पाटील यांची याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचा आधार घेत तक्रार केली. - डॉ. जे. डी. पवार, अध्यक्ष, गिरणा बँक


तक्रारीनुसार गुन्हा दाखल
रामराव पाटील यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जाच्या चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात गृहमंत्रालयाकडून कुठलाही हस्तक्षेप झाला नाही. - कुलवंतकुमार सरंगल, पोलिस आयुक्त