आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेखच्या चौकशीची सूत्रे उच्चस्तरीय यंत्रणेकडे; लष्कराच्या हद्दीची छायाचित्रण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- लष्कराच्या प्रतिबंधित क्षेत्रात मोबाइलवर छायाचित्रण करणारा संशयित शब्बीर हारून शेख (41, रा. कोपरखैराणे, नवी मुंबई, मूळ सोलापूर) हा पोलिसांच्या कोठडीत असला तरी तपासाची सूत्र लष्कर व गृह विभागाच्या उच्चस्तरीय यंत्रणेने ताब्यात घेतली आहेत. गेल्या दोन दिवसांत त्याच्याकडून असमाधानकारक उत्तरे मिळत असल्याने संशय बळावला आहे.

लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेने गोपनीय अहवाल उच्चस्तरावर पाठविल्याने यातील गुंता वाढला आहे. स्थानिक गुप्तचर यंत्रणा पोलिसांच्या तपासाची माहिती वेळोवेळी जाणून घेत आहे. पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल वरिष्ठ स्तरावर तपास करीत आहेत. लष्करी हद्दीतील संवेदनशील भागात छायाचित्र काढण्यावर बंदी आहे, ही माहिती असतानाही त्याने जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे. दहशतवादी कृत्य करणारा बिलावल व शेख हे दोघे सोलापूरचेच रहिवासी असल्याने दोघांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. साऊथ एअरफोर्सचे सिक्युरिटी ऑफिसर विनय काळे यांनी प्राथमिक चौकशी करून शेखला पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, त्याच्याकडील छायाचित्रांची माहिती मिळाल्यानंतर लष्कराची यंत्रणा सतर्क झाली असून, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत शेखला ताब्यात घ्यायचे की पोलिस ठाण्यात जाऊन चौकशी करायची याबाबत विचार सुरू आहे.

आठवणीसाठी फोटो : काही वर्षांपूर्वी शाबीर शेखची बहीण साऊथ परिसरात राहात होती. तेव्हा तो नाशकात येत होता. बहीण राहात असलेल्या शहराची आठवण असावी म्हणून फोटो काढल्याचे स्पष्टीकरण त्याने दिले. त्याने बसमधून प्रवासादरम्यान बसस्टॉप, रेल्वे स्थानकच नव्हे, तर थांबे, बसच्या वेळेची माहिती घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.

फोटो कोणाला पाठवले?
देवळाली कॅम्पसह संवेदनशील भागात काढलेले फोटो शाबीर शेखने कोणाला पाठवले का? त्याच्याकडील मोबाइलमध्ये व्हाट्सअँप आहे का, त्या माध्यमातून ते फोटो कोणाला पाठवले का, याचा तपास सुरू आहे.

वरिष्ठ स्तरावर तपास
तपास योग्य दिशेने असून, वरिष्ठ अधिकारी त्यांच्या स्तरावर तपास करीत आहेत. केंद्र व राज्याच्या पथकाकडून चौकशी केली जात आहे. शाबीर हारून शेख मूळ सोलापूरचा असून, कुर्ला येथील शाळेत असून, सध्या नवी मुंबई येथे राहात असल्याने स्थानिक पोलिसांच्या मदतीने तेथील माहिती मिळविली जात आहे. -किशोर सूर्यवंशी, वरिष्ठ निरीक्षक, देवळाली कॅम्प