आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढत्या गुन्हेगारीमागे केवळ राजकारणच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - वाढत्या गुन्हेगारीला केवळ राजकीय व्यक्ती आणि राजकारणच जबाबदार असल्याचा आरोप सर्वच पक्षीय नेत्यांकडून केला जात असला तरी नेमके गुन्हेगारांना कोण अभय देते, राजकारणासाठी गुन्हेगारांचा वापर कोण करते, याबाबत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सत्ताधारी आणि विरोधकांकडून होत आहे.
‘राष्ट्रवादी’चीच जबाबदारी - शहरातील वाढत्या गुन्हेगारीला केवळ सत्ताधारीच जबाबदार आहे. पोलिसांवर वचक ठेवणारे गृह खाते राष्ट्रवादीकडे आहे. पालकमंत्री राष्ट्रवादीचेच आहेत. सत्ताधा-यांकडूनच गुन्हेगारांना संरक्षण मिळत असल्याने पोलिसांचीही अडचण होत आहे. कारवाई वेळी सत्ताधा-यांकडूनच दबाव येत असल्याचे पोलिस अधिका-यांचे म्हणणे आहे. - अर्जुन टिळे, महानगरप्रमुख, शिवसेना
पालकमंत्रीच जबाबदार - शहरातील गुन्हेगारी वाढत चालली असून, पोलिस यंत्रणा अकार्यक्षम असल्यामुळे गुन्हेगारांचे फावले आहे. पोलिसांकडे पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे तेच या सर्व दुर्घटनांना जबाबदार असल्याचे सर्वसामान्यांचे मत आहे. सामान्य व्यक्तींना गुन्हेगारीमुळे जगणे मुश्कील झाले आहे. पालकमंत्रीही याविरोधात ठोस कृती करीत नसल्यामुळे संशयाचे धुके गडद होत आहे. - विजय साने, माजी शहराध्यक्ष, भाजप
विरोधकांचे राजकारण - सत्ताधा-यांना बदनाम करण्यासाठी वा अपप्रचारासाठी विरोधकांकडे मुद्दाच उरलेला नाही. त्यात निवडणुका तोंडावर असल्यामुळे सत्ताधा-यांना अकारण अडचणीत आणण्यासाठी विरोधकांकडून वाढत्या गुन्हेगारीबाबत आरोपांची राळ उठवली जात आहे. शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांना कडक सूचना देण्यात आल्या असून, या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचे षड्यंत्रही रचले जात आहे. या गुन्ह्यांची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली आहे. - समीर भुजबळ, खासदार, राष्ट्रवादी कॉँग्रेस
तोच खरा गुन्हेगार - गुन्हेगाराला जात, समाज वा पक्ष नसतो. मात्र, जो पक्ष त्यांना सांभाळतो तोच खरा गुन्हेगार असतो. नाशिकमध्ये गुन्हेगारांना कोणता पक्ष सांभाळतो हे सर्वश्रुतच आहे. सत्ताधा-यांमुळे गुन्हेगारांचे फावत असून, पालकमंत्र्यांनी याचे उत्तर देणे क्रमप्राप्त ठरते. गेल्या पाच वर्षांपासून वाहनांची जाळपोळ करून दहशत माजवण्याचे प्रकार सुरू असून, यामागे कोणाचे हात होते हेही उघड झाले आहे. पोलिसांच्या कारवाईला सत्ताधा-यांकडून बळ देण्याऐवजी अडथळे आणले जात आहे. चांगले पोलिस अधिकारी नाशिकमध्ये आणले जात नसल्याने गुन्हेगारी वाढतच आहे. - वसंत गिते, आमदार तथा प्रदेश चिटणीस, मनसे
वाढत्या गुन्हेगारीला सत्ताधारीच जबाबदार - पोलिसांवर सत्ताधा-यांचा अर्थातच गृह खात्याचा अंकुश आहे. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार सत्ताधारीच ठरतात. वाढत्या गुन्हेगारीच्या प्रमाणात पोलिसांची संख्या कमी आहे. राजकारण्याचे सर्व राजकारण गुंडांच्या जोरावर सुरू आहे. सर्वच पक्षांमधून गुन्हेगारीला खतपाणी मिळत असल्यामुळे शहरातील शांतता धोक्यात आली आहे. - डॉ. डी. एल. कराड, माकप