नाशिक- विधानसभा निवडणूक आणि पाठोपाठ आलेल्या दिवाळीत पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात आली असली, तरी दिवाळीनंतर गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नाशिककर भीतीच्या सावटाखाली आहेत. दरम्यान, गेल्या आठवडाभरात इंदिरानगर व सिडको परिसरात अनेक ठिकाणी घरफोडी व चोरीच्या घटना घडल्याने महिलांसह ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी ज्येष्ठांकडून केली जात आहे. इंदिरानगर व सिडको परिसरात काही दिवसांपूर्वी एकाच इमारतीतील अनेक घरे फोडण्यात आली होती, तर पाथर्डी गावातही दोन दुकाने चोरट्यांनी फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या दोन्ही घटनांबरोबरच सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याने महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. इंदिरानगर परिरसात मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक राहतात. चोरट्यांकडून पाळत ठेवून या भागात घरफोड्या होत असल्याने पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवावे, अशी मागणीही होत आहे.
पोलिसांचा वचक घटला
इंदिरानगर भागात काही दिवसांपासून सलग चोरीच्या घटना घडत असूनही पोलिसांकडून कारवाई झालेली नाही. पोलिसांचा वचक कमी झाल्याने गुन्हेगारांचे फावल्याचे चित्र दिसत आहे. वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे गस्त वाढवून गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.