आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुन्हेगारीत वाढ; पोलिसांची कारवाई प्रभावहीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुने नाशिक- काठे गल्ली परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाहनचोरी, सोनसाखळी चोरी आणि घरफोडीसारखे प्रकार वाढले आहेत. या भागात नाकेबंदी केवळ दंडवसुलीपुरतीच उरल्याने गुन्हेगारीच्या घटना कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात लोकप्रतिनिधींनीही लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
काठेगल्ली परिसरात त्रिकोणी गार्डन पुढे तपोवन रस्त्यादरम्यान गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नव्या वसाहती उभ्या राहिल्या आहेत. श्रीलता अपार्टमेंट, सुनंदा हाइट्स, अक्षर इस्टेट घोडेबाबानगर भागात चोरीच्या घटना घडल्या. सोसायट्यांमधून वाहनचोरीचे प्रकार वाढल्याने, तसेच दुपारच्या सुमारास घरफोडीचे प्रकार घडल्याने महिलावर्गात दहशत पसरली आहे.
उन्हाळ्याच्या सुट्या सुरू असल्याने अनेक कुटुंबे, नातेवाईक, देवदर्शन अथवा पर्यटनासाठी गेल्याने बंद घरांची टेहळणी करून फोडण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे दुपारी रात्री या भागात गस्तीची मागणी करण्यात येत आहे.
चौकीची मागणी कायमच
कुंभमेळ्याच्या दृष्टीने तपोवन परिसरालगत असणाऱ्या काठेगल्ली परिसरात पोलिस चौकीची गरज आहे. या भागात पोलिस चौकीची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. याबाबत पोलिस प्रशासनाकडून विचार होणे गरजेचे आहे
महिलांमध्ये अधिक धास्ती
- गेल्या काही दिवसांत चेनस्नॅचिंगच्या घटना वाढल्या आहेत. गेल्याच आठवड्यात काठेगल्ली सिग्नलवर सर्वांसमोर एका रिक्षात बसलेल्या महिलेची चेन बाइकवरून आलेल्या दोघांनी लांबवली. या घटनांमुळे महिलांमध्ये अधिक धास्ती आहे.
प्रतीक्षा पवार, गृहिणी
पोलिसांची उपस्थिती असून नसल्यासारखी
- त्रिकोणी गार्डन परिसरात गेल्या काही दिवसांपासून पोलिस रस्त्यावर उभे राहून वाहन तपासणी करतात. मात्र, येथील चोरीच्या घटनांवर त्याचा कोणताही परिणाम नाही. त्यांची उपस्थिती असून नसल्यासारखी आहे.
डॉ. वनश्री पलोड, स्थानिक रहिवासी
पोलिसांनी गस्त वाढवावी
- पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवावी. आजवरच्या चोरीच्या घटना घडणार नाहीत, यासाठी त्यांनी उपाययोजना कराव्यात.
डॉ.वृषाली व्यवहारे, स्थानिक रहिवासी
टवाळखोरांचा बंदोबस्त करा
- काठे गल्लीपरिसरात टवाळखोरांचा वावर वाढला आहे. पोलिसांनी नियमित मोहीम राबवून त्यांचा बंदोबस्त करायला हवा. या भागातील टवाळखोरांचा पोलिसांनी कायमचा बंदोबस्त करावा.
दीपा निकुंभ, गृहिणी
बातम्या आणखी आहेत...