आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, District Hospital, Divya Marathi, Treatment

पोलिस कर्मचार्‍यावर प्राणघातक हल्ला,दोघा संशयितांना ताब्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या खून प्रकरणातील आरोपीस जिवे मारण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव बंदोबस्तावरील पोलिस कर्मचार्‍याने वेळीच हाणून पाडला. याचा राग डोक्यात ठेवून या टोळक्याने पोलिस कर्मचार्‍यालाच लक्ष्य करीत त्याच्यावरच प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. गुन्हेगारांच्या या वाढत्या दहशतीचा फटका पोलिस यंत्रणेलाच बसला असून, मध्यरात्री दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हवालदार भानुदास हादगे यांना शनिवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. यातील संशयित विलास देवीदास लोणारे (रा. सिन्नर), शाकीर नासीर पठाण (रा. सिडको), सुनील चांगले (रा. रामवाडी) व अमोल जाधव (रा. सिन्नर) यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. मोहन चांगले खून प्रकरणातील आरोपी गिरीश शेट्टी यास भेटण्यासाठी हे संशयित रुग्णालयातील लॉकअपजवळ आले होते. या वेळी तेथे बंदोबस्तास असलेले हादगे यांनी भेटण्यास मज्जाव केला व चौघांना बाहेर काढले. संशयितांनी हादगे यांनाच बघून घेतो, असा दम दिला व ते पसार झाले. काही वेळानंतर हादगे दुचाकीवरून मुख्यालयात जात असतानाच वेदमंदिराजवळ विरुद्ध दिशेने रिक्षा आणून त्यांच्या अंगावर घालत त्यांना जिवे मारण्याचा या चौघांनी प्रयत्न केला. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्याचे बघून चौघे पसार झाले. जखमी हादगे यांना नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी नाकाबंदी करून संशयित विलास लोणारे, शाकीर पठाण यांना ताब्यात घेतले, तर दोघे फरार झाले.

खुनाचा बदला घेण्याचा कट : सराईत गुन्हेगार मोहन चांगले याच्या खून प्रकरणी अटकेतील मुख्य संशयित गिरीश शेट्टी यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणल्याची माहिती संशयितांना मिळाली. चांगले याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याला संपवायचा हा हेतू ठेवून संशयितांनी कट रचल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला.

दोघे सराईत गुन्हेगार
पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. सिडकोतील वाहन जाळपोळ, प्राणघातक हल्ले, लुटमारीचे गुन्हे दाखल असलेल्या टिप्पर गॅँगचा शाकीर पठाण याच्याविरुद्ध पंचवीस गंभीर गुन्हे दाखल आहेत.

कारागृहात रवानगी
या प्रकारानंतर संशयित गिरीश शेट्टी याच्या जीविताला धोका लक्षात घेता त्यास तातडीने रात्रीतूनच मध्यवर्ती कारागृहात रवानगी केल्याचे सांगण्यात आले. दोघांच्या अटकेसाठी पथके पाठविण्यात आली आहेत.