आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोर समजून सिन्नरच्या बँक कर्मचा-यांना चोप, पार्टीसाठी निर्जन स्थळी जाणे पडले महागात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर - निवांत ठिकाणी सोमरस पार्टीसाठी जागा शोधणा-या एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या अधिका-यांना चोर समजून बेदम मारहाण करण्याचा प्रकार पास्ते गावच्या चिमण खो-यात घडला. शनिवारी रात्री कारमधून जाणा-या या अनोळखींना चोर समजून ग्रामस्थांनी बेदम मार दिल्याने सोमरस प्राशन करण्यापूर्वीच त्यांची पार्टीची झिंग क्षणात उतरली.

तालुक्यात भुरट्या चोरांच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक सतर्क झाले असून स्वसरंक्षणासाठी त्यांनी रात्रीची गस्त सुरू केली आहे. पास्तेच्या चिमणखो-यात रात्री १२ च्या सुमारास आलेली कार गस्त घालणा-या तरुणांच्या नजरेतून सुटली नाही. त्यातच कारमधील पाच पुरुषांच्या संशयास्पद हालचालींमुळे तरुणांचा संशय बळावला. तरुणांनी कारमधील प्रवाशांकडे चौकशी सुरू केली. पण त्यांची विचित्र व असंबद्ध उत्तरे संशयात भर टाकणारी ठरली. चोर आल्याची वार्ता परिसरात पसरताच ग्रामस्थ लाठ्या-काठ्या घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गाडीतील संशयितांना बाहेर ओढत कपडे काढून बेदम मारहाण केली. या गोंधळातच त्यातील एकाने आपली खरी ओळख सांगत पार्टी करण्यासाठी निर्जनस्थळी आल्याची कबुली दिली.
दरम्यान या प्रकाराची माहिती पोलिसांपर्यंतही पोहोचली होती. गस्तीवरील दोन कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी खात्री करत मारहाण झालेल्या व्यक्तींची सुटका केली.या सुरस प्रकाराची शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.
चोरांच्या अफवेने रात्रीचा प्रवासही आता अवघड बनला असून बाहेर गावचा पाहुणाही ग्रामस्थांच्या संशयीत नजरेतून सुटत नसल्याने रोज नव्या किस्स्यांना जन्म मिळत आहे.