आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Goldsmith Store, Divya Marathi

नाशकात सराफी पेढीवर गोळीबार, सोने, दागिने लुटण्‍याचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकरोड येथील दत्तमंदिर रोडवरील मे. शहाणे सराफ या पेढीवर चार हिंदी भाषिक दरोडेखोरांनी गोळीबार करून सोने व दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. रविवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पोटात गोळी लागल्याने अभय अरुण शहाणे गंभीर जखमी झाले. दरम्यान, पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून दोन संशयितांना अटक केली.

दरोडेखोरांपैकी एक जण दुपारी दोनला अंगठी तयार करण्याच्या बहाण्याने दुकानात आला. त्या वेळी सागर शहाणे यांनी ‘आपला भाऊ अभय शहाणे दुकानात नाही, तो आल्यानंतर या,’ असे सांगितले. दुपारी तीनच्या सुमारास अभय दुकानात आले. त्याच वेळी बाहेर ह्युंदाई व्हेर्ना कारमधून चार जण आले व थेट दुकानात घुसले. एक जण वरच्या मजल्यावर गेला. त्याने सागरला पिस्तुलदाखवून सोने आणि मोबाइल हिसकावले. खाली तिघांनी अभयवर पिस्तूल रोखून काउंटरची काच फोडत मंगळसूत्र घेतले. अभय यांनी प्रतिकार केला असता एकाने अभयच्या पोटात गोळी झाडली. जखमी अवस्थेतही अभयने फुटलेल्या काचेचा तुकडा गोळी झाडणा-याच्या पोटात मारला. त्यात पिस्तूल खाली पडले. दोघेही प्रतिकार करीत असल्याने दरोडेखोरांनी कारमधून पळ काढला. याच भागातील चहावाला अजिंक्य नालकर याने दुचाकीवरून कारचा पाठलाग केला, मात्र आरोपी सापडले नाहीत. अजिंक्यने गाडीचा क्रमांक (एमएच 12 जीजे 6524) लक्षात ठेवला. झटापटीत दुकानात पडलेला दरोडेखोरांचा मोबाइल पोलिसांना सापडल्याने त्यांचा माग काढता आला.

कसारा घाटात पाठलाग करून आरोपी जेरबंद
अजिंक्यने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तातडीने गाडीची माहिती ग्रामीण पोलिसांना कळवली. कसारा घाट पार केल्यानंतर पडघा नाक्यावर ही व्हेर्ना बॅरिकेड्स तोडून जाताच त्याचा ग्रामीण पोलिसांनी पाठलाग केला. त्यांना थांबवून जखमी हैदर अली गब्बू शेख याला ताब्यात घेतले. त्याने साथीदारांची नावे सांगितल्यानंतर आणखी एकाला अटक करण्यात आली.