आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, House Breaking, Adgaon Police, Divya Marathi

50 घरफोड्या करणारे तिघे आडगाव पोलिसांकडून जेरबंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिक शहरात आणि राज्यासह परराज्यात घरफोड्यांचे 50 हून अधिक गुन्हे दाखल असणार्‍या सराईत गुन्हेगारांना आडगाव पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात जेरबंद केले. पोलिस उपआयुक्त अविनाश बारगळ व निरीक्षक बाजीराव महाजन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ही कामगिरी केली. या पथकाने राजेश रामशंकर शर्मा उर्फ भय्या (रा. उत्तर प्रदेश), राजेंद्र बाळासाहेब राऊत उर्फ राजा राऊत (रा. जालना) व इरफान हसन शेख उर्फ डॉन (रा. उत्तर प्रदेश) या तिघांना त्रिमूर्ती चौक (सिडको), तपोवन आणि धात्रक फाटा येथे सापळा रचून अटक केली. हवालदार बाबा शेख, अरुण गायकवाड, सुगन साबरे, प्रभाकर गवळी, बाळा शादरुल, नजीम शेख, संजय जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. शहर पोलिसांसाठी ही मोठी कामगिरी असल्याचे सांगून उपआयुक्त बारगळ यांनी या पथकास बक्षीस जाहीर केले.
अशी झाली कारवाई : पोलिस कर्मचारी नजीम शेख हे धात्रक फाटा येथे गस्त घालत असताना इरफान हसन शेख दुचाकीवरून मोबाइल रिचार्ज करण्यास आला होता. विना क्रमांकाची दुचाकी दिसल्याने पोलिस कर्मचारी नजीम शेख यांनी त्याच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली. मात्र, त्याने पळण्याचा प्रयत्न केला. याचवेळी पाठलाग करून त्याला अटक करण्यात आली. संशयित जोधपूर येथे अडीच वर्षे कारागृहात होते. कारागृहातून सुटल्यानंतर त्यांनी नाशिकमध्ये घरफोड्यांचा धडाका लावला होता.


आतापर्यंत 50 घरफोड्या : संशयितांवर विविध पोलिस ठाण्यांत घरफोडीचे पुढीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत : अंबड 10, उपनगर 8, सातपूर 1, गंगापूर 11, आडगाव 5, भद्रकाली 5 , तसेच इतर चोर्‍यांचे 15 गुन्हे दाखल आहेत. तर जोधपूर, जालना, औरंगाबाद येथील गुन्ह्यांची माहिती मागवण्यात आली आहे.


मोबाइल ठरला तपासाचा दुवा
पकडलेल्या संशयिताच्या मोबाइलवर राजा राऊत याचा फोटो होता. त्यावरून संशयिताचा माग काढणे पोलिसांना सोयीस्कर गेले. पोलिस पथकाने सापळा रचून सिडकोतील त्रिमूर्ती चौकात राऊत यास अटक केली. तिसरा संशयित राजेश शर्मा उर्फ भय्या यास मोबाइलवर संपर्क साधून तपोवन परिसरात जेरबंद करून पोलिस पथकाने ही मोहीम फत्ते केली.