आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Two Boys Diong Suicide Issue At Nashik, Divya Marathi

दोन मुलांची रेल्वेखाली आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- देवळाली कॅम्प येथील न्यू स्टेशनवाडी परिसरातील दोन अल्पवयीन मुलांनी धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. देवळाली कॅम्प येथील अमित अपना बाजारच्या संचालकाने मुलांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत परिसरातील संतप्त नागरिकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढल्यानंतर या प्रकरणी संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
संसरी रेल्वेगेट ते देवळाली रेल्वे स्थानकादरम्यानच्या कि. मी. क्रमांक 182/6/8 जवळ रविवारी रात्री मुंबईकडून भुसावळकडे जाणा-या विदर्भ एक्स्प्रेसखाली मयूर दिगंबर कोकाटे (17) व कुणाल संजय जाधव (15) यांनी आत्महत्या केली. श्रीधर उद्धव रोकडे (45) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत जातिवाचक शिवीगाळ, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोकडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मयूर व कुणाल हे अमित अपना बाजार येथे दोन महिन्यांपासून कामास होते. रविवारी या दुकानाचे संचालक देवेनदास रोहेरा यांनी फोन करून या दोन मुलांनी दुकानातून खाद्यतेलाचा डबा चोरल्याचे सांगत त्यांना दुकानात येण्यास मनाई केली. पोलिसांत याबाबत तक्रार करणार असल्याची तंबीही त्यांनी दिली. दुकानात गेल्यानंतर रोहेरा व त्यांचा मुलगा अमित यांनी मला व या दोन मुलांना मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केली. यामुळे अपमानित झाल्यानेच या दोन मुलांनी आत्महत्या केली.
नाशिकरोड येथे मोर्चा
मयूर व कुणालच्या आत्महत्येची बातमी स्टेशनवाडी परिसरात समजताच रहिवाशांनी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून वरिष्ठ निरीक्षक राजेश आखाडे यांच्याकडे घडलेल्या प्रकाराची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. रेल्वे पोलिसांच्या अखत्यारीतील हा प्रकार असल्याचे निरीक्षक आखाडे यांनी सांगितल्यानंतर संतप्त रहिवाशांनी नाशिकरोडच्या लोहमार्ग पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून दुकानाच्या संचालकांविरुद्ध जातिवाचक शिवीगाळ, चोरीचा आरोप, मारहाण व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार, लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास निरीक्षक सुभाष भोये, सहायक किरण सुराशे करीत आहेत.
कारवाईचे अधिकार पोलिसांना
कायद्यान्वये 14 वर्षे वयाखालील मुलांना कामास ठेवल्यास कारवाई करण्याचे अधिकार दुकान निरीक्षकांना, तर 14 वर्षांपुढील मुलांबाबतचे अधिकार पोलिसांना आहेत. -बाळासाहेब बागुल, दुकान निरीक्षक