आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi,GPSR System, Pune, Car, Divya Marathi

जीपीआरएस प्रणालीने पाच तासांत पुण्‍यातून चोरण्‍यात आलेली कार शोधली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येवला - जीपीआरएस प्रणालीमुळे पुणे येथून शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी चोरून नेलेली इनोव्हा अवघ्या पावणेपाच तासांमध्ये शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. येवला पोलिसांनी हे वाहन आरोपीसह ताब्यात घेत पुणे पोलिसांच्या हवाली केले.


पुणे शहरातील नवीसांगवी परिसरातील पिंपळेगुरव येथील चोरट्यांनी शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास इनोव्हा गाडी (एमएच 12 जीझेड 3246) चोरून पसार केली. पहाटे पाच वाजता मालक अशोक ब्राह्मणे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी फिर्याद दाखल केली. कारमध्ये जीपीआरएस प्रणाली असल्याने चोरीला गेलेले वाहन कुठे आहे व कुठल्या मार्गावरून जात आहे, याचा लगेच शोध लागतो. त्यानुसार पुणे पोलिसांनी वाहनाची माहिती नाशिक पोलिसांना कळवली. नाशिक येथील कंट्रोलवरून येवला हद्दीतील धानोरे गावाजवळ हे वाहन असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यांनी लगेचच कर्मचारी पाठवले. तेव्हा तांदुळवाडी फाट्याजवळ पोलिसांना ही कार दिसली. त्यांनी आरोपीसह ती ताब्यात घेतली.


इतरांनीही किट बसवावे
ऑटो प्रो कंपनीचे जीपीआरएस प्रणालीचे किट अवघ्या 8 तासांत इनोव्हात तीन महिन्यांपूर्वीच बसवले होते. या प्रणालीमुळे चोरीला गेलेल्या वाहनाचा लगेच तपास लागला. वाहनाच्या मालक, चालक यांनी हे किट वाहनात बसवावे व प्रादेशिक परिवहन विभागानेही या किटला मान्यता द्यावी, जेणेकरून चोरीला गेलेल्या वाहनाचा तपास शक्य होईल, असे इनोव्हाचे मालक ब्राह्मणे म्हणाले.