नाशिक- शहरातकोम्बिंग अॉपरेशन आणि अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरूच असून, मुंबई-आग्रारोड येथील एका प्रख्यात तारांकित हॉटेलच्या मागे सुरू असलेला अवैध जुगार अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या कारवाईमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासह पाच संशयितांना अटक करण्यात आली. १७ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. रक्कम, दुचाकी, मोबाइल असा सुमारे साडेचार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. शुक्रवारी(दि. १७) दुपारी उपआयुक्त धिवरे यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रारोडवरील एक प्रख्यात तारांकित हॉटेलमागे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांना मिळाली होती. या माहितीच्या अाधारे जुगार अड्ड्यावर छापा मारला. येथे तीन पत्ती जुगार सुरू असल्याचे निदर्शनास आले. शिवसेना पदाधिकारी सुदाम डेमसे यांच्यासह पाच संशयितांना अटक करण्यात आली, तर १२ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपआयुक्त श्रीकांत धिवरे, वरिष्ठ निरीक्षक सदानंद इनामदार, सहायक निरीक्षक राजेश गवळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सराईतगुन्हेगार पिस्तूलसह जेरबंद : सराईतगुन्हेगाराकडून गावठी बनावटीचे पिस्तूल हस्तगत करण्यास गुन्हे शाखा युनिट च्या पथकाला यश आले. शुक्रवारी सकाळी अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात विविध गुन्ह्यांत फरार असलेला सराईत गुन्हेगार शेखर विटकर हा त्याच्या साथीदारासह देशी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाली होती. निरीक्षक आनंद वाघ, रवींद्र साळुंके, नितीन कामे, रमेश घडवजे, रवींद्र पिंगळे, गणेश घारे, नितीन भालेराव, राहुल सोळसे यांच्या पथकाने अंबड येथील बंद पडलेल्या कंपनी परिसरात सापळा रचला. दुपारी १.३० वाजता दोन संशयित कंपनी परिसरात आले. पथकाने छापा टाकून संशयितांना अटक केली. विटकरसह सोनू लहानू कटारे पिस्तूल खरेदी करणारा अब्रार मुक्तार शहा या तिघांना अटक करण्यात आली. संशयिताकडून दुचाकी पिस्तूल असा सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.