आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेळसा चाेरांचा पर्दाफाश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पातूर (जि. अकाेला) शहरानजीकच्या महामार्गावर ट्रक पेटल्याने खळबळ उडते. काेळसा वाहतुकीचा ट्रक बघून नागरिक गर्दी करतात. मात्र, ट्रकचालक, क्लीनर जवळपास दिसत नसल्याने त्यांनीच पैशासाठी काेळसा विकून ट्रक पेटविल्याचा संशय व्यक्त हाेताे. पाेलिसही दाखल हाेतात. ट्रक क्रमांक अथवा इतर माहिती मिळत नव्हती. ट्रक नेमका कुठून अाला, काेणी पेटविला, यामागचे कारस्थान उघडकीस अाणण्याचे अाव्हान निर्माण झाले हाेते. तपासात पुढे चालक, क्लीनर दाेघांची हत्या झाल्याची धक्कादायक बाब समाेर अाली. कुठलेही धागेदोरे नसताना तत्कालीन उपनिरीक्षक व सध्याचे अंबड पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर हे संशयितांच्या मुसक्या अावळतात.

मार्च १९९८ मधील पातूर-बाळापूर रस्त्यावर सायंकाळी ट्रक पेटल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. गस्तीवर असलेले तत्कालीन उपनिरीक्षक बर्डेकर घटनास्थळी पाेहोचले. महामार्गालगत दिखलात एक ट्रक जळत असल्याचे दिसले. अग्निशमनदलाच्या पथकाने अाग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रकचा नंबर दाेन्ही बाजूला जळालेला असल्याने काहीच दिसत नव्हते. केबीनमधील काही भाग जळाला असल्याने अातमध्ये जाणेही अवघड असल्याचे बघून पोलिस बुचकळ्यात पडले. बर्डेकर यांनी कर्मचाऱ्यांना सांगून चिखल स्वच्छ करण्यास सांगितले. त्यावर औरंगाबाद, नयनतारा ट्रान्सपोर्ट असे नाव अाढळले. हाच धागा पकडत बर्डेकरांनी तपास सुरू केला. अाैरंगाबाद पाेलिसांशी संपर्क साधून तेथे कर्मचारी पाठविला. ट्रान्सपाेर्ट असाेसिएशन कार्यालयात जाऊन नयनताराचा क्रमांक शाेधला. त्यानुसार संपर्क केल्यावर अामचा कुठलाही ट्रक गायब झालेला नाही. ट्रक जालना, उस्मानाबादकडेच जातात. अकाेल्याकडे संबंधच नसल्याचे सांगून बाेलणे टाळले. दुसरीकडे बर्डेकर यांनी बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे सर्वत्र कळविले. दुसऱ्या दिवशी सकाळी पातूरपासून १०० किलाेमीटरवरील शिरपूरअंतर्गत मसला गावाच्या हद्दीत एक मृतदेह अाढळला. त्याच्या खिशात लायसन्स, नयनताराच्या नावाची पावती मिळाल्याचे समजले. ही माहिती बर्डेकरांना मिळताच त्यांनी ट्रान्सपाेर्टचालकाला तुमचा चालक चाेखाजी निकम याचा खून झाल्याचे कळविले. काेळसा चाेरण्याच्या उद्देशाने चालकाचा खून करून ट्रक पळविला अाणि संशय येऊ नये म्हणून दूरवर जाऊन पेटवून दिला असावा, अशी पक्की खात्री पटली. सायंकाळपर्यंत ट्रान्सपाेर्टचालक घटनास्थळी पाेहोचल्यावर निकम यांचा मृतदेह अाेळखला. परंतु, निकम याच्यासाेबत संताेष हा त्याचा मुलगाही हाेता, असे सांगताच पाेलिसही चक्रावले. मग संताेष गेला कुठे, त्याचा शाेध सुरू झाला. दरम्यान, एकीकडे ट्रकचा तपास लागला असला, तरी खुनाचे धागेदाेरे हाती लागत नव्हते. बर्डेकर पुन्हा ट्रकच्या ठिकाणी गेले. तेथे बघितल्यावर ट्रकचे मागचे दाेन टायर काढून नेल्याचे लक्षात अाले. हे टायर जवळच्या टायर विक्रेता, पंक्चरवाल्याकडे विकल्याचा संशय अाला. त्यानुसार घटनास्थळापासून दाेन्ही बाजूच्या चार ते पाच किलाेमीटरवरील हाॅटेल, ढाबे, पंक्चर दुकानात चाैकशी करण्यात अाली.
टायरच ठरला दुवा : अखेरीस दाेन किलाेमीटरवरील एका ढाब्यालगत पंक्चर दुकानात ट्रकचे टायर अाढळले. पंक्चर काढणाऱ्यास विश्वासात घेतल्यावर त्याने सांगितले की, दाेघे एका जीपमध्ये अाले हाेते. उद्या रात्री टायर घेण्यासाठी परत येणार अाहेत. याअाधारे स्वत: बर्डेकर यांनी पथकासह पेहराव बदलून सापळा रचला. काेणी वेटरच्या वेशात तर काेणी पंक्चर काढणाऱ्याच्या हाताखाली काम करण्याच्या वेशात हाेते. ढाब्यावरील खाटेवर झाेपून त्यांची प्रतीक्षा करीत हाेते. रात्री ८ वाजता एका जीपमधून दाेघे उतरले. त्यांना संशय येऊ नये म्हणून काेणीही त्यांच्याकडे बघत नव्हते. त्यांनी टायर उचलून जीपच्या दिशेने जाताच दबा धरून बसलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. या दाेघांमध्ये सय्यद अफरस मुजफ्फर, फिराेजखान नबाबखान (रा. मालेगाव, अकाेला) यांची नावे समाेर अाली. त्यांचे रेकाॅर्ड तपासल्यावर त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी उघडकीस अाली. बर्डेकर यांनी दाेघांची स्वतंत्र चाैकशी करीत संपूर्ण कटाचे कारस्थान त्यांच्या ताेंडून वदवून घेतले.