आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

.. अन् वाचले शंभर जणांचे प्राण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑक्टोबर 2010चा ऐन लक्ष्मीपूजनाचा दिवस .. घरोघरी चैतन्याचे दिवे तेवत होते.. त्याच दिवशी सकाळी खबर्‍याकडून माहिती मिळाली. चामोश्रीपासून घोटरस्त्यावर नारायणपूरनजीक जंगलात पाच जण नक्षलींना भेटत असल्याचे त्याने सांगितले. तिथेच पहाडावर त्यांचे वास्तव्य असल्याचीही शंका त्याने व्यक्त केली. आणखी एका खबर्‍याकडून पडताळणी केल्यावर खात्री पटली.

याआधारे अधीक्षकांना कळवून चार टिम तयार केल्या. वेळ, वाहनांची माहिती गोपनीय ठेवत मध्यरात्री 2 वाजता खासगी वाहनांतून मोहिमेवर निघालो. 20 किलोमीटरचे अंतर कापले गेले. ताफ्यातील सुमोचा एक मोटारसायकलस्वार पाठलाग करीत असल्याचे लक्षात आले. सुमोचालकाने गाडी मागे फिरवित त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो झाडाझुडपांतून पसार झाला. पुन्हा ताफा नारायणपूरकडे रवाना होऊन पहाडाजवळ आम्ही पोहोचलो. पहाडाला वेढा घालून शोध सुरू केला; मात्र सकाळी 8 वाजले तरी हाती काही लागले नाही. ज्या दुचाकीने चकमा दिला, तीच याठिकाणी झुडपात मिळाल्याचे स्पष्ट झाले. संशयित जवळच्याच गावात लपल्याची शक्यता बळावली. आमच्या पथकाने वेशांतर करून नारायणपूर छेाटे आणि मोठे अशा दोन्ही गावांत खबर्‍यांमार्फत शोध सुरू केला. आठ तासांनंतर वेगवेगळ्या ठिकाणाहून पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांना लगेच मुख्यालयात आणले. हे पाचही जण तोंड उघडत नव्हते. 24 तास हेच काम करत असल्याने संपूर्ण पथकाच्या पोटात अन्नाचा कणही गेलेला नव्हता. कसून चौकशी सुरूच होती. दुसर्‍या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत कोणीही तोंड उघडले नाही.

अखेरीस एकाने तोंड उघडले. गाव, पोलिस, यंत्रणेची ते माहिती घेत असत. दुसर्‍याने रस्ते, बाजार, ग्रामंपचायचीचे ठिकाण दाखविल्याचे, तर तिसर्‍याने सायकल, दुचाकीने फिरविल्याचे सांगितले. चौथ्याने बाजारातून स्टीलचे 15 ते 25 किलोचे पाच डबे खरेदी केले. शेवटच्यानेही काही डब्या, कांड्या, चकाकणर्‍या वस्तू, सेल विकत घेतल्याचेही सांगितले. संपूर्ण माहिती कागदावर उतरवून वर्कआउट केले. त्यातून ठामपणे नक्षलींची मोठी कारवाई होणार हे स्पष्ट झाले. कदाचित स्फोट अथवा मुख्यालयावर हल्ला करतील. तत्काळ एसआरपी कमांडोंशी चर्चा केली. पुढे दोन, तीन दिवस कुठलीही मोहीम राबवू नका, अशा सूचना दिल्या. त्यासोबत रेकी केली, मी स्वत:च वेश बदलून घटनास्थळी पोहोचलो. नारायणपूरच्या अलीकडे पाच किलोमीटरवर मोठय़ा चढावर आम्ही थांबलो. चढ आणि जागेवरच वळण, बाजूला नाला होता. तिथून पुढे काही अंतरावरच दोन झाडांमध्ये लाल रंगाचे बांधलेले फडके लटकवलेले दिसल्याने संशय पक्काच झाला. रस्त्याच्या बाजूला उतरून मोरीचा भाग बघितला. तिथे दोन्ही बाजूंना चुना, खडीने नुकतेच भिंत बुजवल्यासारखे दिसून आले. याच ठिकाणी काहीतरी लपविल्याचे दिसू लागले. चामोश्री आणि मुलचरा दोन्ही ठाण्यांतील अधिकार्‍यांना व बॉम्ब शोध व नाशक पथके (बीडीडीएस) बोलावून ‘सर्च ऑपरेशन’चे प्लॅनिंग झाले. पहाटे 6 वाजताच दोन ट्रक, टेम्पो, दोन सुमो, जीप या वाहनांमधून घटनास्थळी आलो. बीडीडीएसच्या तीन टीम बनवून नाल्यापासून पाच किलोमीटर अलीकडे व तेवढय़ाच अंतरावर पुढे एक आणि नाल्यावर मुख्य पथक शोध घेत होते. नाल्याच्या खाली उतरल्यावर ज्याठिकाणी लिंपलेले होते, ते खोदत असतानाच बीडीएसच्या मेटल डिटेक्टरला सिग्नल मिळाला. इतर दोन्ही टीमला बोलावून घेत गाड्या दूरवर उभ्या केल्या. मोजक्यांना घटनास्थळी ठेवल्याने एक किलोमीटर अंतरावर दोन्ही बाजूंनी वाहतूक थांबवली. 10-12 मीटरच्या रस्त्याच्या पृष्ठभागावर डांबर आच्छादलेले असताना त्याला लागून नाल्याचा भाग कोरला. एका वायरचा पॉइंट मिळाला. तो हातात धरून पुढेपुढे जमीन कोरत गेलो. मात्र, प्रत्येक पावलावर धोका होता.

दुसरा पॉइंट शोधताना विरुद्ध बाजूनेही कोरण्यास सुरुवात केली. पण काहीही हाती लागले नाही. 15 मीटरच्या वायरला दोन सेल हाती लागले. मात्र, त्याचे कनेक्शन सापडत नव्हते. रस्त्याच्या खाली उतरून नाल्याचे खोदकाम सुरू केले. लोखंडी रॉड, वर्तरुळाकार पाइप लागला. बीडीडीएसच्या रॉडला सिग्नल मिळाला. रस्त्याच्या मधोमध खाली एक मोठा स्टिलचा डबा दिसला. विरुद्ध दिशेने शोध घेणार्‍यांनाही एक डबा दिसला. जागेवर प्रत्यक्ष एकच डबा आढळून आला. जागरूकता दाखवित बीडीडीएसने त्याचे कनेक्शन तोडले. जवळपास एक ट्रक भरेल इतका मातीचा ढीग जमा झाला होता. डबा बाहेर काढल्यावर त्यात प्लास्टिक पिशवीत जिलेटीनच्या कांड्या, दारूसाठा भरलेला होता. जवळपास 25 किलो वजन होते. गावठी स्फोटक वाटत असले तरी बीडीडीएसच्या म्हणण्यानुसार भयंकर व शक्तिशाली. दोन मोठय़ा ट्रकचे वजन पडताच स्फोट झाला असता. त्यात टाइमर तपासले असता त्याच दिवशी रात्रीचा टाइम सेट केलेला. चीफ कमांडोला हे कळताच घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणाहून रात्री 9 वाजता दोन मोठय़ा ट्रकने किमान 100 जवानांची कंपनी आणि दहा कमांडोंचा ताफा जाणार होता. क्षणाचा विलंब न करता व निर्णय घेत वेळीच कारवाई केल्याने जवानांचे प्राण वाचविले. पुढे मी पथकासह मोर्चा वळविला तो स्फोटके लपविणार्‍यांच्या शोधासाठी. पाचही संशयितांना विश्वासात घेऊन माहिती घेतली असता एटापल्ली येथील कुविख्यात ‘बिच्छू’ हाच हा यामागील मास्टरमाइंड होता. संशयितांमधील दोघांच्या मदतीने एकेक धागा उलगडत बिच्छू व त्याच्या सात साथीदारांना आठवडाभराच्या आत अटक करण्यात यंत्रणेला यश आले. हा बिच्छू गडचिरोलीतच नव्हे, तर शेजारच्या छत्तीसगड राज्यातील पोलिसांच्या रेकार्डलाही वॉण्टेड होता.