आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारांच्‍या गुन्हेगारी पार्श्वभूमीचे फलक मतदान केंद्रांवर लागले; कुंडली वाचुनच करा मतदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीतील उमेदवारांची सर्व माहिती मतदान केंद्रांबाहेर झळकविण्याची तयारी निवडणूक आयोगाकडून पूर्ण झाली असून, सोमवारी (दि. २०) मतदान यंत्रणेसोबतच उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमीची संपूर्ण माहिती असलेले फलकही केंद्रप्रमुखाला देण्यात आले. या फलकावर उमेदवारांचे शिक्षण, संपत्ती आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी याची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. 
 
स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतील उमेदवाराला उमेदवारी अर्जासोबत शिक्षण, संपत्ती तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी इ. माहिती सादर करावी लागते. ही माहिती शपथपत्राद्वारे उमेदवाराला देणे बंधनकारक असते. उमेदवारांनी दिलेल्या शपथपत्राआधारे निवडणूक निर्णय अधिकारी ही माहिती निवडणूक निर्णय कार्यालयाबाहेर प्रसिद्ध करतो. तसेच, ही माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात येते. शपथपत्राद्वारे दिलेली ही माहिती सार्वत्रिक केली जात असली तरी त्याला मर्यादा येत होत्या. निवडणूक निर्णय कार्यालय तसेच संकेतस्थळ या दोनच ठिकाणी ही माहिती पाहता येत होती. 

यामुळे सर्वच मतदारांना उमेदवारांची माहिती मिळत नव्हती. या सर्व पार्श्वभूमिवर राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांची ही सर्व माहिती वर्तमानपत्रासह मतदान केंद्राबाहेर फलकावर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या सर्व उमेदवारांची माहिती केंद्राबाहेर लावले जाणार आहेत. सोमवारी(दि.२०) मतदान यंत्रणेसोबतच उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमीचा संपूर्ण माहिती असलेला फलकही केंद्रप्रमुखाला देण्यात आले. 
 
१०० मीटर परिसरात उमेदवारांना निवडणूक बंदी 
महापालिकानिवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात उमेदवारांना निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. यामुळे १०० मीटरच्या आत आता कोणीही उमेदवार दिसणार नाहीये, तर या ठिकाणी उमेदवारांनी मतदारांना नमस्काराला केल्यास हा प्रचाराचा भाग समजला जाणार असून, आचारसंहिताभंगाचा भाग असे समजून अशा उमेदवारांवर पोलिस कारवाई केली जाणार आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...