आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भाईं’चा जेलबाहेर येण्यासाठी आटापिटा; राजकीय पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींच्या संपर्कात?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मध्यवर्ती कारागृहात असलेल्या टोळीप्रमुखांसह गुन्हेगारांचा बाहेर येण्यासाठी आटापिटा सुरू आहे. बहुतांशी गुन्हेगारांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. अर्थसाह्यासाठी थेट राजकीय पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींच्या ते संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. दोन वर्षांनी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत गुुन्हेगारांसाठी कोण राजकीय ‘वजन’ वापरते, अशा नेत्यांवर आता पोलिसांकडून नजर ठेवली जात आहे. 

 

गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस प्रशासनाने धडक कारवाई करत शहरातील कुख्यात टोळ्यांचे ‘भाई’ आणि सदस्यांसह तब्बल ३० सराईत गुन्हेगारांना गजाआड केले आहे. पोलिस दलास प्रथमच इतक्या संख्येत गुन्हेगारांना अटक करण्याची ही पहिलीची धडक कारवाई करत पोलिस आयुक्त डॉ. सिंगल आणि पथकाला गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यात यश आले. आता हे गुन्हेगार बाहेर येऊ नये यासाठी सतर्कता बाळगली जात आहे. गुन्हेगारांच्या बारीक हालचालींवर पोलिसांकडून ‘नजर’ ठेवली जात आहे. कारागृहात असलेल्या भाईंनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. याचा फायदा दोन वर्षांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांकडून घेतला जाण्याची शक्यता अाहे. 

 

गुन्हेगारी विश्वात दबदबा असलेल्या कोष्टी, दिवे, परदेशी, निकम, चांगले या गँगच्या कथित भाईंना सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी कामाला लागले आहेत. आजी-माजी लोकप्रतिनिधींचे ‘खास’ पथक यासाठी तैनात करण्यात आले आहे. खून प्रकरणात नगरसेवक हेमंत शेट्टी, राकेश कोष्टी, कुंदन परदेशी, श्याम महाजन या सराईत गुन्हेगारांसह, दोन खुनांच्या गुन्ह्यात फरार व्यंकटेश मोरे आणि टोळीसह चांगले गँगचा गणेश चांगले सध्या कारागृहात आहे. दोन वर्षांपेक्षा अधिक काळ कारागृहात असलेल्या अंबड येथील कुख्यात टिप्पर गँगचा समीर पठाण, गण्या कावळ्यासह ११ गुन्हेगारांचा यामध्ये समावेश आहे. प्रणव बोरसे याची टोळी जेरबंद झाल्याने अंबड, सिडको परिसरातील गुन्ह्यांची संख्या घटली आहे. अागामी निवडणुकीत ‘साम, दाम, दंड’ नीती वापरत या भाईंच्या ताकदीच्या बळावर निवडणुका जिंकण्याचे मनसुबे ठेवणारे इच्छुक कितपत यशस्वी होतात हे बघण्याची उत्सुकता आहे. 

 

अर्थसाह्य करणाऱ्यांवर करडी नजर 
टोळ्यांनाअर्थसाह्य करणारे तसेच जामीनदार ‘न्यायिक’ साह्य करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. अधिकाऱ्यांना ‘फ्री हॅण्ड’ दिल्याने गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी डॉ. सिंगल आणि पथक सज्ज झाले आहे. आयुक्तांकडून पाठबळ मिळत असल्याने पोलिस अधिकाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण असल्याने धडक कारवाई सुरू आहे. उपआयुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, विजयकुमार चव्हाण, सचिन गोरे, मोहन ठाकूर, वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर, मंगलसिंह सूर्यवंशी, मधुकर कड, डॉ. सीताराम कोल्हे, सुनील पुजारी, सुभाषचंद्र देशमुख प्रयत्नशील आहे. 

बातम्या आणखी आहेत...