आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट नाशिक आराखडा निर्मिती क्रिसिलकडे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतिम शंभर शहरांच्या यादीत नाशिकचाही समावेश असल्याने योजनेमध्ये प्रारंभीच्या टप्प्यातच समावेश होण्यासाठी महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. केंद्र सरकारच्या निकषात पूर्णत: बसण्यासाठी महापालिकेने क्रिसिल या सल्लागार संस्थेची नेमणूक केली असून, ही संस्था आता स्मार्ट सिटीसाठी शहराचा आराखडा तयार करणार आहे. या कामासाठी क्रिसिलला केंद्र सरकार सुमारे सव्वा कोटी रुपये देणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेसाठी निवडलेल्या १०० शहरांची अंतिम यादी दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे जाहीर करण्यात आली. यादीत समावेश झालेल्या शहरांचा नियोजनबद्ध विकास करण्याच्या प्रयोजनाने सुरू केलेल्या या योजनेच्या अंतिम यादीत महाराष्ट्रातील नाशिक, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, अमरावती, सोलापूर, नागपूर, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद पुणे या शहरांचा समावेश आहे. कोणत्याही परिस्थितीत नाशिकचे नाव योजनेतून बाद होऊ नये, यासाठी प्रशासनाने स्मार्ट चॅलेंज स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दुसऱ्या टप्प्यात स्मार्ट सिटी प्रप्रोजल (एससीपी) तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्यात आले आहेत. यासंदर्भात काढलेल्या निविदा प्रक्रियेत सर्वात कमी खर्चाची निविदा क्रिसिलची असल्याने या संस्थेची सल्लागार संस्था म्हणून निवड केल्याची माहिती शहर अभियंता सुनील खुने यांनी दिली.

काय असेल आराखड्यात?
>आरोग्य शिक्षण क्षेत्रात देण्यात येणाऱ्या सुविधा.
>शाश्वत पर्यावरण व्यवस्थेसाठीच्या योजना.
>सुप्रशासन, ई-गव्हर्नन्स, नागरी सहभाग.
>सक्षम माहिती तंत्रज्ञान डिजिटलायजेशन यंत्रणा.
>झोपडपट्टीमुक्त नाशिकसाठी घरकुल योजना.
>शहरात समाधानकारक पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी प्रयत्न.
>वीजपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छतेविषयीची व्यवस्था, घरांची अधिकाधिक उपलब्धता आदींच्या सुधारणा योजना.
>विकास आराखडा, सॅनिटेशन आराखडा, मोबिलिटी प्लॅन, मास्टर प्लॅनचा विचार करून आगामी पाच वर्षांतील शहराचे चित्र.
>महिला बालकांच्या सुरक्षिततेसाठीच्या योजना.
>सुधारणा, शहराचे नूतनीकरण विस्तार आदी बाबींचा विचार.
>सविस्तर नागरी सल्लामसलत करून धोरणाची निश्चिती.
>भौतिक, आर्थिक सामाजिक स्तरावर विश्लेषण.
>शहरातील नेमक्या अडचणींचा वस्तुनिष्ठ शोध.
>पाच वर्षांत शहरामध्ये राबवल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती.

धडपड पहिल्या २० मध्ये येण्याची...
देशातील१०० ‘स्मार्ट सिटीं’वर पुढील पाच वर्षांत तब्बल ४८ हजार कोटी खर्च करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात २० शहरे आणि दुसऱ्या टप्प्यात ८० शहरे ‘स्मार्ट' करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यातीलच २० शहरांत समावेश होण्यासाठी नाशिक महापालिका कसून प्रयत्न करणार असून, क्रिसिलमार्फत तयार करण्यात येणारा सविस्तर आराखडा डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल.